दीपक खिलारे
इंदापूर : आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात कमळ फुलवण्यासाठी युवा मोर्चा सज्ज आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील-ठाकरे यांनी केले.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांनी भोर, वेल्हा, पुरंदर, बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेऊन त्यांच्याशी संघटनेचा विस्तार, शाखा विस्तार, आगामी निवडणुकीमध्ये युवा मोर्चाची भूमिका यासंबंधी चर्चा केली. जिल्हा बैठकीच्या दौऱ्यानंतर इंदापूर येथील दूधगंगा येथे भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अंकिता पाटील ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अंकिता पाटील-ठाकरे म्हणाल्या की, नुकतीच आमची जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाली असून, त्या अनुषंगाने आम्ही जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये दोन दिवसांचा दौरा करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संघटनात्मक चर्चा केली. जिल्ह्यात गाव तिथे शाखा सुरू करून संघटनेचा विस्तार, युवा संघटन तसेच नमो प्रतियोगिता स्पर्धेच्या माध्यमातून युवक संघटनेसाठी प्रयत्न करणार आहे. भारतीय जनता पक्षाने पक्ष वाढवण्याची मोठी जबाबदारी दिली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील जिल्ह्यामध्ये दौरा झाला आहे. युवा मोर्चा व्यापक स्तरावर पोहचला असून, बारामती मतदारसंघात येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत कमळ फुलविण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, असेही पाटील यांनी सांगितले.
या बैठकीस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कुणाल टिळक, उपाध्यक्ष प्रिया पवार, प्रदेश सचिव रोनक शेट्टी, कार्यकारिणी सदस्य अनिकेत हरपुडे, युवा मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीस अजिंक्य टेकवडे, वैभव सोलनकर, उपाध्यक्ष साकेत जगताप, स्वप्नील मोडक व इतर कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.