बारामती : बारामती कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार हे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय झाले होते. बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला असून, खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या सांगण्यावरुन युगेंद्र पवार यांना बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. युगेंद्र पवार यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी कुस्तीगीर संघाच्या पदावरून हटवल्याचे अधिकृत पत्र मिळाले नाही. परवा रात्री एका ठिकाणी बैठक झाल्याचे कानावर आले. पण ही केवळ चर्चा आहे. कोणी कशावरही चर्चा करेल, मात्र प्रत्येक चर्चा खरीच असते असे नाही. मागील तीन-चार वर्षांपासून मी कुस्तीगीर संघाची जबाबदारी पार पाडत आहे. या काळात खूप कामे केली. अजितदादांनी देखील मदत केली आहे.
मात्र, आपल्याला या संदर्भातील कोणतेही अधिकृत पत्र मिळाले नाही, असे युगेंद्र पवार यांनी सांगितले. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या बाजूने काम केल्याची ही पोचपावती आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता युगेंद्र पवार म्हणाले, याबाबत तुम्ही जो अर्थ लावायचा तो लावू शकता. मात्र, माझ्याकडे कुठलीही अधिकृत माहिती नाही. यासंदर्भात जर काही पत्रव्यवहार यावर झाला, तर मी ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेईन, असे सांगितले.