बारामती : बारामतीतून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि युगेंद्र पवार यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच अजितदादा पवार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर सभेवेळी बोलताना त्यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. याबरोबरच आईचा उल्लेख करताना अजितदादा भावूक झाले. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी भाष्य केलं आहे.
त्यावर युगेंद्र पवार म्हणाले, “ती माझी आजी आहे. लहानपणापासून मला आशीर्वाद देत आली आहे. मी कधीच आजीला राजकारणात आणलं नाही. कधी आजीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला नाही. मी आजीचं नावंही घेतलं नाही. मला ते जपायचं आहे. मला आजीला राजकारणात आणायचं नाही.”
तसेच मी प्रचारात होतो, त्यामुळे मला दादांचं सर्व भाषण ऐकता आलं नाही, पण त्यांच्या भाषणातील काही मुद्दे पाहिले आणि मी वाचले. मी त्यांच्यापेक्षा वयाने खुप लहान आहे. आपल्यापेक्षा मोठे किंवा वरिष्ठ असतात, त्यांच्यावर बोलायचं नसतं. त्यामुळे मला त्यावर भाष्य करणं योग्य वाटत नाही, असेही युगेंद्र पवार म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?
अजितदादा पवार म्हणाले, ‘मी सुप्रियाच्या विरोधात लोकसभेला सुनेत्राला उभं करायला नको होतो, जो काम करतो तो चुकत असतो. मी मनाचा मोठेपणा दाखवला आहे अन् माझी चूकही कबूल केली आहे. पण आता चूक कोणी केली, पहिला फॉर्म मी भरणार होतो. आम्ही सगळे तात्यासाहेब पवारांची फॅमीली. आम्ही बिकट परिस्थितीमधून वर आलो आहोत. माझ्या आईने आम्हाला आधार दिला, आई सांगते फॉर्म भरू नका माझ्या दादाच्याविरोधात. हे जे काय चाललं आहे ते बरोबर नाही, मग त्याच्यामध्ये मोठ्या व्यक्तींनी सांगायला पाहिजे होतं, फॉर्म कोणी भरायला सांगितला तर साहेबांनी फॉर्म भरायला सांगितला, म्हणजे साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का? असा प्रश्न करताच अजित पवार यांना सभेच्या स्टेजवर अश्रू अनावर झाले.
दरम्यान, बारामतीत लोकसभेनंतर विधानसभेतही पवार विरुद्ध पवार, अशी लढत होणार आहे. या लढतीकडे महाराष्ट्रासह देशातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.