शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील चाकण चौकात वाहतूक नियमनाचे काम करत असताना बुलेटच्या सायलेन्सरमधून कर्कश आवाज काढणाऱ्या दुचाकी चालकाला पोलिसांनी अडवल्याने दोघांनी पोलिसांशी हुज्जत घालून पोलिसांना धक्काबुक्की केली. याबाबत पोलीस शिपाई विकास बाबासाहेब मोरे (रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी प्रतीक बाळासाहेब आढाव (रा. करवंदी, ता. नेवासा, जि. अहमदनगर) व दादा अंकुश चव्हाण (रा. शिक्रापूर, ता. शिरुर, जि. पुणे) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
शिक्रापूर येथील चाकण चौकात १४ जुलै रोजी पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, पोलीस नाईक शिवाजी चितारे, रोहिदास पारखे, विकास मोरे हे वाहतूक नियमांचे काम करत असताना बुलेट दुचाकीहून एक युवक सायलेन्सरमधून कर्कश आवाज काढत आला. यावेळी पोलिसांनी त्याला थांबवत नाव विचारून चौकशी केली असता पोलिसांना अरेरावी करू लागल्याने पोलीस त्याला पोलीस स्टेशन येथे घेऊन जात असताना तिथे दादा चव्हाण हा युवक आला. त्याने पोलिसांना दमदाटी करत ‘माझी बुलेट आहे. तुम्ही घेऊन जायची नाही. प्रतीक माझा मित्र आहे. त्याला कोणी हात लावला तर त्याला चौकात गोळ्या घालीन,’ अशी धमकी देत पोलिसांशी हुज्जत घालून पोलीस शिपाई विकास मोरे यांची कॉलर पकडत त्यांच्या हाताला दुखापत केली.
यावेळी या पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये फोन करून पोलीस शिपाई प्रताप कांबळे व स्वप्नील गांडेकर यांना बोलावून घेत त्यांच्या दुचाकीसह त्यांना ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतीक जगताप हे करत आहेत.