लोणी काळभोर: स्वत: साठी सर्वजण जगत असतात. मात्र, समाजासाठी जगणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत. ज्या साधू संतांनी आपले देहभान हरपून समाजाची सेवा केली आहेत. त्यांचे आदर्श आपण नेहमी डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. त्यातील एक म्हणजे महाराष्ट्रातील थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार संत गाडगेबाबा होय. त्यांनी दिवसभर गाव स्वच्छ केल्यानंतर रात्री लोकांचे मन स्वच्छ करण्यासाठी कीर्तन केले. कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करून अंधश्रद्धा दूर केली. परिश्रम, परोपकार याची शिकवण दिली. ‘देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराण, तंत्र-मंत्र, चमत्कार यावर विश्वास ठेवू नका’ असा संदेश दिला. त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असून तरुण पिढीने त्यांचे आदर्श घेतले पाहिजे, असे प्रतिपादन वक्ते शशिराव शेंडगे यांनी केले आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या 68 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प वाहून शुक्रवारी (ता.20) अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन शशिराव शेंडगे यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी, पर्यवेक्षक विलास शिंदे, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना शशिराव शेंडगे म्हणाले की, संत गाडगेबाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील अंजन गावात 23 फेब्रुवारी, 1876 साली झाला. धोबी कुटुंबात जन्मलेले डेबूजी झिंगराजी जानोरकर पुढे गाडगेबाबा म्हणून ओळखले जाऊ लागले. धर्मशाळेजवळील एका झाडाखाली त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य घालवलं. डोक्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडकं, फाटलेली चादर हीच त्यांची संपत्ती होती.
दरम्यान, समाजाचे अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता याचे उच्चाटन हेच गाडगेबाबांचं ध्येय होतं. दुर्बल, अनाथ, अपंगांची ते नेहमी सेवा करत. संत गाडगेबाबा जिथं कुठे जायचे, तिथंला रस्ता स्वच्छ करण्याचं काम हाती घ्यायचे. गावातील लोक त्यांना पैसे द्यायचे, ज्याचा उपयोग त्यांनी समाजविकासासाठी केला. या पैशांतून त्यांनी गावांमध्ये शाळा, धर्मशाळा, हॉस्पिटल आणि जनावरांसाठी निवारा बांधला. अज्ञान, अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला. गाडगेबाबा शिकलेले नव्हते, तरी ते खूप बुद्धिमान होते, असेही शेंडगे यांनी सांगितले .
यावेळी बोलताना प्राचार्य सीताराम गवळी म्हणाले की, देव दगडात नसून तो माणसांत आहे, हे त्यांनी लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला. मी कोणाचा गुरू नाही, कोणी माझा शिष्य आहे असं म्हणायचं नाही, असे गाडगे बाबा म्हणायचे. भुकेलेल्या अन्न द्या, तहानलेल्या पाणी द्या. वस्त्रहीन व्यक्तींना वस्त्र द्या. गरीब मुलांना शिक्षणात मदत करा, प्रत्येक गरीबाला शिक्षण देण्यात योगदान द्या. बेघर असलेल्यांना आसरा द्या. अंध, विकलांग, आजारी व्यक्तींची मदत करा. बेरोजगारांना रोजगार द्या. पशू-पक्षी, मूक प्राण्यांना अभय द्या, गरीब, कमजोर लोकांच्या मुलांच्या लग्नात मदत करा. दुखी आणि निराश लोकांना हिमंत द्या, हाच खरा धर्म आहे आणि हीच खरी ईश्वरभक्ती आहे, हे गाडगे बाबांचे सांगणे होते, असे प्राचार्य गवळी यांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन करताना सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जानराव यांनी केले.