उरुळी कांचन, (पुणे) : तू मला खूप दिवसांपासुन आवडतेस, तु माझ्याशी लग्न कर, नाही तर तुला जगू देणार नाही, असे म्हणत 18 वर्षीय तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी एका 22 वर्षीय तरुणावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश बाळू बोरावके (वय-22, रा. माळशिरस ता. पुरंदर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी (ता. 31) उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी एका 18 वर्षीय तरुणीने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची तरुणी ही उरुळी कांचन येथे राहते. तरुणी व आरोपी आकाश बोरावके हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सदरची तरुणी ही घरी असलेल्या स्वतःच्या दुकानात जेवण करीत असताना आरोपी आकाश बोरावके हा त्या ठिकाणी आला होता. यावेळी त्याने सदर तरुणीचा हात पकडून तू मला खुप दिवसांपासुन आवडतेस, तु माझ्याशी लग्न कर, नाही तर तुला जगू देणार नाही असे म्हणाला. तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच घरी जात असताना वारंवार पाठलाग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान, याप्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी आकाश बाळू बोरावके याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 75, 78, 351(2), 351 (3) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार निलेश जाधव करीत आहेत.