शिक्रापूर : जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील एका महाविद्यालयीन युवतीशी सोशल मीडियातून ओळख करून युवतीचा पाठलाग करत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रोहित राजेंद्र शिंदे (रा. जातेगाव बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.
जातेगाव बुद्रुक येथील संभाजीराजे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युवतीची रोहित शिंदे या युवकाने सोशल मीडियातून ओळख करून घेतली. त्यांनतर रोहित वारंवार युवतीशी बोलण्याचा प्रयत्न करत असताना युवती त्याला टाळत होती. मात्र, रोहित युवतीला धमकावत असल्याने युवती त्याच्याशी बोलू लागली. परंतु, रोहित वारंवार युवतीचा पाठलाग करत असल्याने युवतीने याबाबत आपल्या आई-वडिलांना माहिती दिली. दरम्यान, युवतीच्या आई- वडिलांनी रोहितला समजावून सांगितले. तरी त्याच्यात काही बदल झाला नाही. त्याने वारंवार युवतीचा पाठलाग करत तिच्या मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्याने युवतीने याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.
पोलिसांनी रोहितविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे करत आहेत.