पुणे: शेअर बाजारातील गुंतवणुकीची माहिती मिळवण्याच्या बहाण्याने तरुणाचे मोटारीतून अपहरण करून पाच जणांनी त्याच्याकडील १६ लाख रुपयांचे आभासी चलन हस्तांतरित करून घेतले. या प्रकरणी तरुणाने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयूर कैलास अमोदकर (रा. जळगाव) याच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुण हा बावधन भागात राहायला आहे. तो शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करतो.
बालेवाडी भागातील हाय स्ट्रीट परिसरातून तरुणाचे २१ जुलै रोजी आरोपी अमोदकर आणि साथीदारांनी अपहरण केले. मोटारीतून त्याला नगर रस्त्याने शिक्रापूर परिसरात नेले. तरुणाला चाकूचा धाक दाखवून आरोपींनी मोबाईल ताब्यात घेतला. चोरट्यांनी तरुणाला धमकावून सांकेतिक शब्द घेतला. तक्रारदार तरुणाच्या मोबाइलमधील अॅपमधून चोरट्यांनी १६ लाख २ हजार ५१० रुपयांचे आभासी चलन चोरून नेले. तरुणाला नगर रस्ता परिसरात सोडून आरोपी आणि साथीदार मोटारीतून पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक चौगुले तपास करत आहेत.