पिंपरी : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. मारुंजी येथील कोलते पाटील सोसायटीच्या गेटसमोर शनिवारी (ता. २१) रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एका अनोळखी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला आहे.
प्रदीप अनिल दाभाडे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत संदीप संतोष गराडे (वय २४, रा. चांदखेड, ता. मावळ) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन स्प्लेंडर प्लस मोटरसायकलवरील (एम एच १४, बी.एच ५२६५) अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र प्रदीप दाभाडे असे दोघे चांदखेडवरुन हिंजवडीकडे कामावर जात होते. दोघेजण संदीप याच्या दुचाकीवरुन (एमएच १४ एफ झेड ६५५६) जात होते. कोलते पाटील सोसायटीच्या गेटसमोरील मदरसन कंपनीसमोर मारुंजी रोड येथून स्प्लेंडर गाडीवरुन आरोपी भरधाव वेगात आला. आरोपीने त्याच्या ताब्यातील दुचाकी बेफिकीरीने चालवून फिर्यादीच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दोघेही दुचाकीस्वार रस्त्यावर पडले. यात फिर्यादी यांचा मित्र प्रदीप हा गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला