पुणे, ता. 6 : दारु आणुन दिल्याचा राग मनात धरुन एकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील भवानी पेठेत शनिवारी (ता.3) रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हाणामारीत एका तरुणाचा गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर खडक पोलिसांनी दोन्ही आरोपींना तत्काळ अटक केली आहे.

गोपाल जयराम आचार्य (रा. काशेवाडी भवानी पेठ, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर दानिश अली शेख ऊर्फ डॅनी (वय 21) व अमिर महमंद शेख (वय 38 रा. कासेवाडी, भवानी पेठ, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर याप्रकरणी गोपालचे वडील जयराम आचार्य (वय 51) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जयराम यांचा मुलगा गोपाल यास वस्तीतील अमिर याने दारु आणण्यास सांगितली होती. तेव्हा गोपालने दारू आणून दिली होती. दारु आणुन दिल्याचा राग मनात धरुन अमिर याचा पुतण्या दानिश हा गोपालला म्हणाला, तु माझ्या चाच्याला दारु का आणुन दिली. असा जाब विचारुन गोपाळला घराबाहेर नेऊन घराच्या भिंतीवर जोर जोरात आदळले. तसेच त्यांच्या तोंडावर मारहाण केली.

त्यानंतर अमिर यानेही गोपाळला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेव्हा त्याच्या डोक्यास मार लागल्याने डोके दुखीचा त्रास होवून उलट्या होवू लागल्या. त्याला उपचारासाठी पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होऊ लागला. तसेच तोंडातूनही रक्ताच्या उलट्या होवून उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला.
दरम्यान, याप्रकरणी गोपालचे वडील जयराम आचार्य यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन्ही आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 103 (1), 125 , 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली आहे. पुढील तपास खडक पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव करीत आहेत.







