पुणेः मुंढव्यातील केशवनगर परिसरात नवीन मोटारसायकल घेतल्याने मित्राबरोबर तिच्यावरून राईड मारणे शनिवारी (दि. २७) तरुणाच्या जिवावर बेतले. भरधाव जाणाऱ्या पाण्याच्या टँकरची धडक बसून हा तरुण मृत्युमुखी पडला. अथर्व संजय कुंभार (वय २५, मुंढवा) हे या तरुणाचे नाव आहे. ही घटना केशवनगर येथील रेणुका माता मंदिराजवळ शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी टँकरचालक संतोष शिवसेवक सिंह (वय ३२, रा. केशवनगर, मुंढवा) याला अटक केली आहे.
अथर्व याचा मित्र अमन विनोद चौधुर (वय २३, रा. केशवनगर, मुंढवा) याने नवी मोटारसायकल घेतली आहे. तो अथर्व कुंभार याला घेऊन नव्या मोटारसायकलवरून फेरफटका मारण्यासाठी मंत्रा सोसायटीपर्यंत गेला. तेथून तो परतत असताना रेणुकामाता मंदिराजवळ समोरून भरधाव आलेल्या पाण्याच्या टँकरने त्यांच्या मोटारसायकलला जोरात धडक दिली. त्यात अमन उडून रस्त्यावर पडला, तर अथर्व जागीच मरण पावला. अपघात झाल्याचे समजताच स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अथर्वला तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.