वाघोली (पुणे) : बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत असेलेल्या एका 21 वर्षीय तरुणावर प्रेम प्रकरणातून कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. वाघोली (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बकोरी येथे मंगळवारी (ता. 28) सायंकाळी ही घटना घडली. हल्ला झालेल्या तरुणाने मृत्यूपूर्वी आरोपीचे नाव सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर युवक हा वाघोलीतील (wagholi) बीजीएस कॉलेजच्या बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. येथे तो एका होस्टेलमध्ये राहत होता. त्याच्यावर हल्ला झाल्यानंतर त्याला तात्काळ ससून रुग्णालयात नेण्यात आले. रूग्णालयात घेऊन जाणाऱ्या साक्षीदाराला जखमी अवस्थेत असणाऱ्या तरुणाने हल्लेखोराचे नाव आणि सदरचा प्रकार प्रेम प्रकरणातून झाल्याचे सांगितले. त्यानंतर तो बेशुद्ध झाला आणि त्याने जीव सोडला.
दरम्यान, जखमी इसमाने सोबतच्या साक्षीदारास दिलेल्या तोकड्या वर्णनावरून आरोपीची सर्व माहिती मिळवण्यात आली असून आरोपीच्या शोधार्थ दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. सदर प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)