पुणे : लोणीकाळभोर परिसरात लग्न करण्यासाठी बळजबरी केल्याने एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर परिसरातील साठेवस्ती येथे 21 मे 2023 रोजी सायंकाळी साडेपाच ते सात वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुदर्शन ज्ञानेश्वर काळभोर (वय-20 रा. साठेवस्ती, लोणी काळभोर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत विजया ज्ञानेश्वर काळभोर (वय-48 रा. साठेवस्ती, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्य्वरून निकीता अशोक ससाणे, शुभम रवी ससाणे, स्वयंम रवी ससाणे, अशोक देवराम ससाणे आणि एक महिला पाचही आरोपी (रा. तारासिटी समोर, रामदरा रोड, लोणी काळभोर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजया काळभोर यांचा मुलगा सुदर्शन काळभोर याला लग्न करण्यासाठी बळजबरी केली. लग्न न केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करू अशी आरोपींनी धमकी दिली होती. दरम्यान, आरोपींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून सुदर्शन याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.
सुदर्शनच्या आईने आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायदंडाधिकारी फौजदारी न्यायालयात एस.जी. बरडे यांच्याकडे दाद मागितली होती. न्यायालयाने 11 जुलै रोजी संहिता कलम 156(3) प्रमाणे तपास करुन त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करा, असे आदेश लोणी काळभोर पोलिसांना दिले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास करुन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.