बारामती : बारामतीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. उसने दिलेले दोन लाख रुपये परत मागणाऱ्या युवकाला बलात्काराची केस टाकू, अशी धमकी देण्यात आली. तसेच वारंवार त्रास दिल्याने एका युवकाने टोकाचं पाऊल उचललं आहे. ज्ञानेश्वर गोपाळराव देवरात (वय ३६, रा. गुणवडी, ता. बारामती) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी तिघांविरोधात बारामती शहर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
ज्योती महादेव आगवणे (रा. एकतानगर, एमआयडीसी, बारामती), बाळू केशव कोळेकर व नाजनीन राजू शेख (दोघे रा. कुंभारकरवस्ती, डायनामिक्स डेअरीमागे, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पल्लवी ज्ञानेश्वर देवरात यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 11 सप्टेंबर रोजीच्या रात्री साडे दहा ते बारा सप्टेंबर च्या पहाटे सव्वा पाचच्या दरम्यान जुना मोरगाव रोड लेंडी पट्टी भागात घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर गोपाळराव देवरात यांनी ज्योती आगवणे हिला दिलेले दोन लाख रुपये परत मागितले. या कारणावरून व ते परत मागू नयेत म्हणून ज्योती आगवणे, बाळू कोळेकर व नाजनीन शेख या तिघांनी संगनमत करून बलात्काराची खोटी केस करण्याची धमकी देऊन वारंवार त्रास दिला व आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी ज्ञानेश्वर देवरात यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भिताडे करत आहेत.