लोणी काळभोर, (पुणे) : लोणी स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाने बाभळीच्या झाडाच्या फांदीला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनव्हेरा स्कुलजवळ असलेल्या तुकाई नर्सरीच्या बाजूला शनिवारी (ता. 13) सकाळी पाऊणे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.
आश्विन बाळासाहेब गायकवाड (वय – 30, रा. शिवाजीराव भोसले बँकेजवळ, लोणी स्टेशन, ता हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आश्विन गायकवाड हा कुटुंबीयांसोबत कदमवाकवस्ती येथील परिसरात राहत होता. सकाळी पाऊणे सात वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर पोलिसांना खबर मिळाली की, इनव्हेरा स्कुल जवळ तुकाई नर्सरीच्या बाजूला काटेरी झुडुपामध्ये बाभळीच्या झाडाच्या फांदीला साडीच्या सहाय्याने एका तरुणाने गळफास घेतला आहे.
पोलीस त्या ठिकाणी गेले असता सदर ठिकाणी त्याचा मित्र सुमित कृष्णप्रसाद शर्मा (वय 30, रा. लोणी स्टेशन) व रुग्णवाहिकेचा चालक नितीन झोंबाडे यांनी त्याच्या गळ्यातील गळफास घेतलेली साडी काढत गायकवाड याला खाली घेतले. बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आळंदी म्हातोबाच्या सरपंच सोनाली तुषार जवळकर यांचे अश्विन गायकवाड हे बंधू होत. पुढील कार्यवाहीसाठी अश्विन याचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास लोणी काळभोर करीत आहेत.