पुणे: महाराष्ट्र विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पक्षाने पहिली यादी जाहीर केल्यानंतर पुण्यातील हडपसर मतदारसंघात बंडाचं निशाण फडकले आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा विद्यमान आमदार चेतन तुपे यांना मैदानात उतरवले आहे. तर शरद पवार यांनी प्रशांत जगताप यांना उमेदवारी देत चेतन तुपे यांच्यासमोर त्यांच्या राजकीय कट्टर स्पर्धकाला रिंगणात उतरवले आहे.
महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी महापौर प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षामधीलच माजी नगरसेवक योगेश ससाणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील माजी आमदार महादेव बाबर हे बंड करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे हडपसरमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार यांच्या पक्षाला गेली आहे.
माजी महापौर प्रशांत जगताप यांना आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी नाराज झाले आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक योगेश ससाणे उद्या (दि.२६) कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन भूमिका जाहीर करणार आहेत. तर महादेव बाबर आज (दि. २५) कोंढवा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्यानंतर शक्तीप्रदर्शन करीत अपक्ष अर्ज भरणार आहेत.
दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे महायुतीत शिवसेनेला सुटणारी जागा ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला सुटली आहे. त्यामुळे शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे हे देखील अपक्ष अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात हडपसरमध्ये दोन राष्ट्रवादी अन् दोन शिवसेनेमध्येच लढत होईल, अशी शक्यता निर्माण आहे. तसेच बंडखोरांना शांत करण्यात महाविकास आघाडीला यश येते का? हे पाहणे देखील महत्वाचे आहे.