उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावर बोरीभडक (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत यवत पोलिसांची पत्र्याची पोलीस चौकी वादळात थेट महामार्गावर येऊन आदळली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे. रविवारी (ता. 19) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन व यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेवटचे गाव असलेल्या उंच ठिकाणी यवत पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी यवत पोलीस ठाणे अंकित छोटी पत्र्याची चौकी उभी केली होती.
रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यात ही टपरी थेट महामार्गावर जाऊन आदळली. यामुळे उरुळी कांचन या ठिकाणी असलेल्या आठवडी बाजारात येणाऱ्या तसेच सलग सुट्ट्यांमुळे सोलापूरहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना व नागरिकांना या वाहतूक कोंडीतून मार्ग काढावा लागत आहे.
दरम्यान, सदर घटनेची माहिती यवत पोलिसांना दिली असून पुढील कार्यवाही सुरु करण्यात येणार असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.