यवत : यवत पोलिसांची गेल्या दोन दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी हातभट्टी चालकांवर कारवाई केली असल्याची माहिती यवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे. ( दि. 23) रोजी खामगाव येथील शेलारवाडी येथे तर (दि.24) रोजी नाथाचीवाडी येथील हातभट्टी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खामगाव गावच्या हद्दीतील शेलारवाडी येथील ओढ्याच्या कडेला (दि. 23) रोजी रात्री 10 च्या सुमारास आरोपी सलमान दुल्ला गुडदावत (वय 40 रा. खामगाव, शेलारवाडी, ता. दौंड) हा दोन हजार लीटर कच्चे रसायन व इतर साहित्य तर 175 लीटर तयार गावठी हातभट्टीची दारू असा एकूण 95 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमाल सहित आढळून आला आहे. याबाबत पोलीस हवालदार रामदास जगताप यांनी फिर्याद दिली आहे.
तर नाथाचीवाडी गावाच्या हद्दीतील हाकेवाडी येथील हनुमंत आबा हाके यांच्या शेतात (दि. 24) रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आरोपी अमरसिंग महानाजी यादव (वय 32, सध्या रा. नाथाचीवाडी मूळ रा. कथारी, ता. आलोट, जि. रथलाम, मध्यप्रदेश) व संतोष जनमले हे दोघे जण गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे तीन हजार लिटर कच्चे रसायन व साहित्य तर 140 लिटर तयार गावठी हातभट्टीची तयार असा एकूण 1 लाख 27 हजार 500 रु . किंमतीच्या मुद्देमालसह आढळून आले आहे.
याबाबत पोलीस शिपाई मारुती बाराते यांनी यवत पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. यावरून महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत नाथाचीवाडी येथील अमरसिंग महानाजी यादव व संतोष जनमले तर शेलारवाडी येथील गावठी हातभट्टी चालक सलमान दुल्ला गुडदावत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी एकूण 2 लाख 22 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भोर व पोलीस नाईक व्ही.डी. कापरे हे करीत आहेत.