यवत : यवत येथे दरवर्षी तृतीयपंथी साजरा करत असलेले गौरी-गणपती यवतकरांचे प्रमुख आकर्षण ठरत असून, गावातील अनेकजण या गौरी गणपतीच्या दर्शनासाठी एकच गर्दी करतात. महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच सर्वत्र गणेशाची मनोभावे पूजा केली जाते, असाच एक बाप्पा आणि गौरी यवतमधील तृतीयपंथी दीपा गुरु रंजता नायक यांच्या घरी दरवर्षी विराजमान होत असतो.
यवत येथे तृतीयपंथी मोठ्या भक्तीभावाने गणरायाची प्रतिष्ठापना करत असतात बाप्पावर असलेल्या नितांत श्रद्धेपोटी दरवर्षी न चुकता हा समाज गौरी गणेशोत्सव साजरा करतो. ढगाळ वातावरण यांचा देखावा यावर्षी सादर करण्यात आला असून, यंदा दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे भरपूर पाऊस पडू दे आणि शेतकरी राजा सुखी होऊ दे, अशी मागणी या तृतीयपंथीयांनी गौरी गणपतीकडे केली आहे.
सर्व तृतीयपंथी समाजातर्फे आणि मंगलामुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गौरी गणपतीसाठी दरवर्षी विविध प्रकारचे आकर्षक सजावट करत असून, या सजावटीतून काहीतरी सामाजिक संदेश देत असतात. परंतु, यावर्षीचे अनेक ठिकाणी एवढा मोठा दुष्काळ पडलेला आहे.
सगळीकडे कुठे ओला दुष्काळ तर कुठे सुका दुष्काळ असल्याने सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे यावर्षी फक्त साध्या पद्धतीने ढगाळ वातावरण असलेला देखावा तयार करून फक्त हे आभाळ येतंय पण बळीराजा सुखी नाहीये, हे सजावटीच्या माध्यमातून प्रयत्न केला. दरवर्षी तृतीयपंथी समाजाच्या वतीने यवत येथील वाड्यात गेल्या ३५ वर्षांपासून ही परंपरा चालू असून, यंदाचे हे ३६ वर्षे आहे.
तसेच तृतीयपंथी समाज यापुढे सामाजिक उपक्रम देखील राबवणार असून, ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या अंतर्गत यवत परिसरातील लोकांना वृक्षारोपण वाटप करणार आहे. बळीराजा सुखाने व सर्व समाज सुखाने, आनंदाने व गुण्यागोविंदाने नांदावेत, सगळ्यांना सुखी ठेव त्यांची मूलबाळं सुखी राहावेत, अशी प्रार्थना आई जगदंबे चरणी केल्याचे सांगितले.