राहुलकुमार अवचट
यवत : दौंड तालुक्यातील यवत येथील ग्रामस्थांनी पारंपारिक पद्धतीने वनभोजनासाठी संपूर्ण गाव बंद ठेवून गावच्या शिवेबाहेर जाऊन वनभोजनाचा आनंद लुटला. यावेळी वनभोजनासाठी ग्रामस्थांनी उस्फूर्त सहभाग घेतला. दरवर्षीप्रमाणे यवत येथे अनेक वर्षाची परंपरा जपत आषाढ महिन्यात एक दिवस संपूर्ण गाव बंद ठेवून गावच्या शिवेबाहेर जावून वनभोजनाचा आनंद घेतात.
पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावाचे वेगाने शहरीकरण होत असुनही सुमारे २५ हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या अनेक वर्षापासुन चालत आलेली जुनी परंपरा ग्रामस्थांच्या वतीने जपली जात आहे. सकाळी ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ व ग्रामदेवी श्री महालक्ष्मी मातेची फेरीची ग्रामप्रदक्षिणा घालण्यात आली.
यावेळी यवत ग्रामस्थ नैवेद्य व नारळ फोडून घरे व दैनंदिन व्यवहार बंद करुन वनभोजनासाठी गावाबाहेर पडले. गावातील हॉटेल, किराणा, तसेच सर्व दुकानदारांनी दुकाने उत्फूर्तपणे बंद ठेवली होती. रविवार असल्याने बँका, शाळा, सरकारी कार्यालयांना सुट्टी होती. त्यामुळे गावात शुकशुकाट पाहायला मिळाला.
यवत गावातील सर्व दुकाने बंद, बाजारपेठेत शुकशुकाट गावातील अंतर्गत रस्ते दौऱ्या बांधून अडविले. रस्त्यावर वाहनांना बंदी असे वातावरण असताना साहजिकच गावात काहीतरी अनुचित घडले असणार अथवा आंदोलन तरी सुरू असणार असा समज आज पुणे-सोलापूर महामार्गावरून जाणाऱ्या व आजूबाजूच्या गावातील नागरिकांना होत होता. गावात आवर्जून थांबून महामार्गालगत बसची वाट पाहणाऱ्या नागरिकांकडे विचारपूस केल्यास याचे खरे कारण अनेकांच्या लक्षात येत होते.
गावाचे शहरीकरण झाले की तेथील लोकांचे राहणीमान, रीतिरिवाज व धार्मिक परंपरा झपाट्याने बदलतात. मात्र, मागील अनेक वर्षापासून यवत गावात सुरू असलेली ‘गावाबाहेर (वनभोजन) ची परंपरा मात्र याला अपवाद ठरत आहे. आषाढ महिन्यात एका रविवारी गावातील सर्व नागरिकांनी गावाबाहेर जावे. कोणीही गावात राहू नये, वाहने फिरवू नयेत, असा गाव बाहेरचा नियम आहे.
सकाळी गावातील नागरिक घराबाहेर पडतात. त्यानुसार आज (दि.२१) गावाबाहेरचे आयोजन केले होते. सकाळी दहा वाजेच्या सुमारास पोतराज व गोधळी मंडळींसह ग्रामस्थांनी वाजतगाजत गाव प्रदक्षिणा काढली. ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व श्री महालक्ष्मी माता यांच्यावरील धार्मिक श्रद्धेतून गावाबाहेर जाण्याचा कार्यक्रम केला जातो. वनभोजनासाठी जाताना गोड जेवणा बरोबरच भेळ, पिठलं भाकरी यांचा नागरिकांचा बेत आखला होता.
गावात येणाऱ्या बाहेरील लोकांना वनभोजनासाठी गाव बंद असल्याचे सांगितल्यावर या परंपरेबद्दल त्यांचे कुतूहल निर्माण झाले. ग्रामस्थांनी गावच्या शिवेवर, तसेच आपआपल्या शेतात सोयीनुसार समूहाने जाऊन गोडधोड जेवण, भेळ, बेसन भाकरी यासह वनभोजनाचा आनंद लुटला. तर तरुणांनी भुलेश्वर, नारायणपूर, केतकावळे बालाजी यांसह आदी पर्यटन स्थळाला भेट दिली. तर काही जणांनी माळशेज, लोणावळा आदी ठिकाणी पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडले. सायंकाळी पुन्हा ६ च्या सुमारास नागरिक गावात परत येत दैनंदिन व्यवहार पुन्हा सुरू झाले.