राहुलकुमार अवचट
यवत : स्थानिक मल्ल राष्ट्रीय खेळाडू मंगेश दोरगे व संतोष नरोटे यांच्यात झालेल्या चितपट कुस्त्यांनी यवतच्या आखाड्याला मोठी रंगत आली. बहुतांश कुस्त्या चितपट झाल्या असल्या तरी यावर्षीचे महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व उपमहाराष्ट्र केसरी सागर बिराजदार यांच्या कुस्तीने यवतकरांनी महाराष्ट्र केसरीचा थरार पुन्हा एकदा अनुभवला.
माघ पौर्णिमेनिमित्त श्री काळभैरवनाथ व श्री महालक्ष्मी माता यात्रेनिमित्त यवत येथे दरवर्षी जंगी आखाडा भरतो. पुणे, कोल्हापूर येथे तालीम करणाऱ्या स्थानिक मल्लांसोबतच पंजाब, हरीयाणासारख्या परप्रांतासह राज्याच्या विविध जिल्ह्यातून अनेक मल्यांनी यावेळी कुस्ती आखाड्यामध्ये सहभाग घेतला. समाधानकारक इनाम मिळत असल्याने येथे मल्लांची मोठी गर्दी झाली होती.
शेवटच्या कुस्तीचे इनाम हे या आखाड्याचे एक वैशिष्ट आहे. दरवर्षी वाढणारा हा आकडा या वर्षी १ लाख ५१ हजार रूपयांवर गेला होता. सायंकाळी ५ वाजता सुरू झालेला आखाड्याची सांगता रात्री ०८ वाजता झाली सुरुवातीला परिसरातील लहान मल्ल्यांपासून प्रारंभ झालेली यात्रा अखेर महाराष्ट्र केसरी पर्यंत यवतकरांनी अनुभवली.
अखेरच्या मानाच्या ५ कुस्त्यांमध्ये नामदेव कचरे विरुद्ध विकास भागवत (२१ हजार ), यवत येथील मल्ल मंगेश दोरगे विरुद्ध संतोष नरोटे (२५ हजार ), अमित पटेल विरुद्ध किसन सावंत (२७ हजार ) , राहुल दिवेकर विरुद्ध दादा मजगडे ( ३१ हजार ) तर यावर्षीचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी सागर बिराजदार यांच्यात १ लाख ५१ हजार रुपयांसाठी अंतिम लढत झाली.
मानाच्या कुस्तीगटातील काही कुस्त्या बरोबरीत सुटली असल्या तरी आखाड्यात गाळलेला घाम आणि त्यांनी केलेल्या डाव प्रतिडावाने लोकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
कुस्ती समालोचक प्रशांत भागवत यांच्या समालोचनामुळे परिसरातील वातावरण कुस्तीमय झाल्याने नागरिकांनी कुस्तीचा खरा आनंद अनुभवला. कुस्ती आखाड्यासाठी पंच म्हणून यात्रा कमिटीचे अध्यक्ष सदानंद दोरगे, सदानंद दोरगे, सतीश दोरगे, संजय दोरगे, दत्तात्रय दोरगे, शंकर दोरगे , दिलीप दोरगे यांनी काम पाहिले.
यवत येथे होणाऱ्या शेवटच्या कुस्त्या या मानाच्या कुस्त्या म्हणून संबोधले जाते यातील बहुतांश कुस्त्या याबरोबरच सोडवल्या जातात. सन २०१९ साली देखील शिवराज राक्षे यांनी अंतिम कुस्तीमध्ये सहभाग घेतला होता ४ वर्षानंतर पुन्हा महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवल्यानंतर महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व सागर बिराजदार यांच्यामध्ये अंतिम कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये दोघांनाही बक्षीसाची रक्कम देऊन सन्मान करण्यात आला करण्यात आला व यात्रेची सांगता झाली.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड , काळभैरवनाथ पतसंस्थेचे चेअरमन नानासाहेब दोरगे, दिलीप यादव, रमेश जैन, चंद्रकांत दोरगे, कैलास दोरगे यांच्यासह देवस्थान कमिटीचे अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.