यवत, (पुणे) : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दितील पारगाव (ता. दौंड) येथील एटीएम फोडण्यासाठी स्फोटके वापरून ब्लास्ट करणाऱ्या टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (ग्रामीण) पोलिसांनी आवळल्या आहेत.
विशाल छबु पल्हारे (वय – २०, रा. हांगेवाडी ता. श्रीगोंदा जि. नगर), आदित्य प्रदीप रोकडे (वय- २०, रा. चिंचणी ता. शिरूर), अनिकेत संजय शिंदे (वय – २०, रा. बोरी ता. श्रीगोंदा जि. नगर), आदित्य खोमणे रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील आदित्य खोमणे याने दिलेल्या माहितीनुसार हा गुन्हा केल्याची कबुली दिली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारगाव येथील एटीएम स्फोटके वापरून ब्लास्ट केल्याची घटना घडली होती. सदर घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस तपासकरीत असताना पोलिसांनी विशाल पल्हारे, आदित्य रोकडे, अनिकेत शिंदे यांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा आदित्य खोमणे याच्या मदतीने केला असल्याची कबुली पोलिसांना दिली.
वरील तिघांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी एकूण तीन वेळा पारगाव येथील एटीएम मशीन स्फोटक पदार्थाच्या सहाय्याने उडवून देऊन चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिली आहे. वरील चारही आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून यवत पोलीसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक तुषार पांधारे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, जनार्दन शेळके, आसिफ शेख, योगेश नागरगोजे, राजू मोमीन, अतुल डेरे यांनी केलेली आहे.