यवत : यवतसह परिसरात गुरुवारी (दि.३०) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मुसळधार पावसाने अचानक हजेरी लावली. यामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचायला सुरुवात झाली होती. सकाळी काही थंडीचे वातावरण असताना दुपारपासून उन्हाचा कडाका जाणवत होता. तर संध्याकाळी सातच्या सुमारास आकाशात अचानक जग ढग दाटून आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
गुरुवारी सायंकाळी सुरुवातीला तुरळक पावसाने हजेरी लावली. परंतु त्यानंतर अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानकपणे पडलेल्या या पावसामुळे नागरिकांची मात्र एकच तारांबळ उडाली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास यवत परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह, ढगांचा गडगडात मुसळधार पाऊस सुरु झाला. यामुळे यवत परिसरात सुरुवातीला पाणी साचले.
पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर, पालखी मार्गावर, स्टेशन रस्त्यावर, शाळेच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांवर, गावात मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागलं होतं.
या तासभर झालेल्या पावसाने यवतकरांची चांगली धावपळ उडाली. रस्त्या शेजारी असलेल्या नाल्यांमधून पाण्याचा निचरा होत नसल्याने सर्व पाणी रस्त्यावर आले. अचानक आलेल्या या पावसामुळे पुणे, हडपसर यांसह भागातून कामावरुन घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची त्रेधातिरपीट उडाली.