लोणी काळभोर (पुणे): थेऊर (ता. हवेली) येथील तेरा वर्षांपासून बंद असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्यची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने दणदणीत विजय प्राप्त केला आहे. यानंतर आता कारखान्याच्या अध्यक्षाची निवड नवनिर्वाचित संचालकातून केली जाणार आहे. त्यामुळे एका तपानंतर यशवंतला नवीन अध्यक्ष मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कारखान्याच्या सभासदांनी कारखान्याची सूत्रे नवीन दमाच्या संचालक मंडळाच्या हाती दिली आहेत. त्यामुळे कारखान्याच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षपद हे प्रस्थापित घराण्यात न जाण्याची शक्यता आहे.
यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीनंतर आता कारखान्याच्या अध्यक्षपदाची व उपाध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी 27 मार्चला कारखान्यावर होणार आहे. पिठासीन अधिकारी शितल पाटील यांनी नवनियुक्त संचालक मंडळाला अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी अजेंडा पाठवला आहे. त्यामुळे गेल्या 13 वर्षांपासून बंद पडलेल्या कारखान्यावर प्रत्यक्ष संचालक मंडळातून अध्यक्षाची निवड होणार आहे.
यशवंत कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जगताप, बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर व कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने 21 पैकी 18 जागांवर दणदणीत विजय संपादन केला होता.
निवडून आलेल्या संचालक मंडळात पॅनेलप्रमुख प्रकाश जगताप यांचे बंधू व गेल्या संचालक मंडळात संचालक असलेले सुभाष जगताप हे एकमेव कारखान्याचे कामाकाजाचा अनुभव असलेले संचालक आहे. तेच यशवंतच्या अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार असणार आहे. तर दुसरीकडे कारखान्यासाठी सतत संघर्षाचा भूमिकेत असणारे माजी संचालक पांडुरंग काळे यांचे चिरंजीव मोरेश्वर काळे हे देखील शर्यतीत असल्याची चर्चा आहे.