लोणी काळभोर: थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची २०२४ ते २०२९ साठीची निवडणूक जाहीर करण्यात आली. २१ संचालकांच्या जागांसाठी ९ मार्चला मतदान होणार आहे. तर मतमोजणी दुसऱ्या दिवशी १० मार्चला होणार आहे.
प्रादेशिक सहसंचालक (साखर) तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी निलीमा गायकवाड व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शीतल पाटील यांनी या संदर्भात निवेदन जारी केले आहे. त्यानुसार गट क्रमांक १, २ व ३ मध्ये संचालकांच्या प्रत्येकी ३ जागा व गट क्रमांक ४, ५ व ६ मध्ये संचालकांच्या प्रत्येकी २ जागा, उत्पादक व बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था या गटातून १ संचालक निवडून येईल.
अनुसूचित जाती जमातीमधून एक संचालक निवडून येईल. महिला राखीवमधून दोन संचालक निवडून येतील. इतर मागासवर्गीयामधून एक संचालक निवडून येईल. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गमधून एक संचालक निवडून येईल.
असा असेल निवडणूक कार्यक्रम…
निवडणूक अधिसूचना ५ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहे. ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान सकाळी ११ ते २ या वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. १२ फेब्रुवारीला दुपारी साडेबारा वाजता उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. अंतिम उमेदवारांची यादी १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. पात्र उमेदवारांना २८ फेब्रुवारी रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. ९ मार्च रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत मतदान होणार आहे. १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता मतमोजणी होणार आहे.
मतदार यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपलब्ध
मतदारयादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात स:शुल्क उपलब्ध होणार आहेत. अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांना ३०० रुपये व इतर उमेदवारांना १००० रुपये अनामत रक्कम भरावी लागेल. उमेदवारी अर्जांची किंमत १०० रुपये आहे. अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग, भटक्या जमाती, विमुक्त जाती जमाती व इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांनी सक्षम अधिकाऱ्याचा जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
अंतिम मतदार यादी १७ जानेवारीला प्रसिद्ध
यापूर्वी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने २६ डिसेंबर २०२३ रोजी तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध केली आहे, त्या यादीवर २६ डिसेंबर ते ३ जानेवारी २०२४ या कालावधीत हरकती नोंदवल्या आहेत. या हरकतींवर १२ जानेवारी रोजी निर्णय घेतला असून, अंतिम मतदार यादी १७ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केली आहे.