विजयकुमार गायकवाड
इंदापूर : सामान्य कुटुंबातून खडतर प्रवास करत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कात्रज या छोटयाशा गावातील लेखक, दिग्दर्शक पंकज पांडुरंग यादव यांनी जिद्द व मेहनतीच्या जोरावर बॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यांचा ‘शांतला’ हा चित्रपट संपूर्ण देशभरात हिंदी, मराठी, तेलगु, तमिळ, कन्नड, मल्याळम या पाच भाषांमध्ये १५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे मराठी भाषेतील संवाद पंकज यादव यांनी लिहिले आहेत. यादव यांच्या यशाचा डंखा देशभरात वाजत आहे.
दरम्यान, मुंबईतील अंधेरी येथे ११ डिसेंबर रोजी या चित्रपटाचा ट्रेलर व गाणे रिलीज करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात हिंदी चित्रपट सृष्टीतील नामवंत दिग्दर्शक महेश भट्ट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दिग्दर्शक महेश भट्ट यांनी सर्व भाषेतील ट्रेलर पाहिले. या संपूर्ण सोहळ्यामध्ये त्यांना मराठी भाषेतील ट्रेलर आवडल्याचे त्यांनी सांगितले तसेच त्यांनी पंकज यादव यांच्या लिखाणाचे भरभरून कौतुक केले.
दिग्दर्शक, लेखक पंकज यादव हे सध्या मालिका दिग्दर्शन क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या ते क्राईम पेट्रोल या मालिकेचे सह दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. त्यांनी आतापर्यंत मन उडू उडू झाले, जय जय स्वामी समर्थ, सावधान इंडिया, सुंदरा मनामध्ये भरली, क्रिमिनल्स, क्राईम अलर्ट अशा विविध मालिकांचे सहाय्यक व सह दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. आधारवड, बापाच्या लग्नाला विघ्न हजार, या मराठी चित्रपटांना व प्लेज टू प्रोजेक्ट या हिंदी चित्रपटाला त्यांनी सह दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. वेस्टन, हत्या की आत्महत्या, वेळ या लघुपटाचे त्यांनी दिग्दर्शन व लेखन केले असून, वेस्टन या लघुपटाची निवड ‘पुणे इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल’साठी झाली आहे. महाराष्ट्रातील गुन्हेगारी क्षेत्रावर आधारित कलम-३०२ या वेब सिरीजचे लेखन व दिग्दर्शनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात या आजाराबद्दल नागरिकांचे अनेक गैरसमज झाले होते. हे गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी विविध व्हिडिओ बनवले. याची दखल ‘हाय रेंज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेऊन त्यांना सन्मानित केले.