दौंड : दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक चालकांची लुटमार करणाऱ्या सहा जणांना दौंड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई अत्यंत शिताफीने तपास करत जामखेड येथील कला केंद्र येथे करण्यात आली आहे. तौफिक रियाज शेख, विक्रम बाळासो माडगे (दोन्ही रा. भिगवण ता. इंदापूर जि. पुणे), शरद अशोक धेंडे, हनुमंत रामभाऊ गायकवाड, अमोल गौतम गायकवाड व भिकाजी वाल्मीक धेंडे (वरील चारही रा. जिंती ता. करमाळा जि. सोलापूर)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ डिसेंबर रोजी रात्रीच्या साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मालवाहतूक चालक जेजुरी वरून बेंगलोर कडे जात होता. त्यावेळी एका बोलेरो जीपने ट्रकचा पाठलाग केला. दरम्यान, एक किलोमीटर पाठलाग करून स्वामी चिंचोली हद्दीतील मल्लिनाथ मठासमोर जीप आडवी लावून ट्रक चालकाला आणि त्याच्या मालकाला लोखंडी टॉमी तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच ट्रक चालकाच्या खिशातील रोख ३३ हजार रुपयांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. त्यावेळी ही बोलेरो जीप राशीन मार्गाकडे निघून गेली.
या प्रकरणी गुन्हा दाखल होताच दौंड चे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी तपास पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, फौजदार रुपेश कदम व पोलिस अंमलदारांना आरोपींना शोधण्यासाठी रवाना केले. गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित बोलेरो ( MH ४२ AS ६६५८) व संशयित आरोपींना जामखेड येथील कला केंद्रातून ताब्यात घेतले.
त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडी, लोखंडी टॉमी व रोख रक्कम असा ६ लाख १ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक नागनाथ पाटील हे करीत आहेत.
दरम्यान, या सहा जणांपैकी तीन जणांवर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. यापैकी तोफिक रियाज शेख याच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह व शस्त्राच्या गुण्यासह सात गुन्हे दाखल आहेत. तसेच दौंड पोलीस ठाण्यात देखील अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या गुन्ह्यासह ९ गुन्हे दाखल आहेत. तर त्याचा साथीदार विक्रम बाळासाहेब माडगे याच्यावर भिगवण आणि करमाळा येथे तीन गुन्हे दाखल आहेत. शरद भेंडे याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. यामध्ये एक पोस्को गुन्ह्याचा देखील समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.