पुणे प्राईम न्यूज डेस्क: अंगणवाडी शिक्षणातही नवीन प्रयोग करून या लहान मुलांच्या शिक्षणाचा दर्जा वाढविता येतो हे आपल्या कामातून दाखवून दिलेय पुण्यातील दामिनी निंबर्ते यांनी.
‘‘एके दिवशी पुण्यातल्या माझ्या नेहमीच्या अंगणवाडी भेटी दरम्यान मला तिथे रंगरंगोटीचे काम सुरू असलेले दिसले. मी त्यांना सुचवले की, भिंतीवर खालच्या भागात मुलांचा सहज हात पोहचेल अशा पद्धतीचा गिरगीट फळा करून घ्या. तसेच अंकांची उलट सुलट मोजणी करण्यासाठी भिंतीवर १ ते १० असे अंक लिहून घ्या. नंतर जेव्हा मी पुन्हा त्या अंगणवाडीत गेले, तेव्हा मी सांगितल्याप्रमाणे तिथल्या भिंतींवर बदल झालेले दिसून आले. विशेष म्हणजे मुलेही अंगणवाडीमध्ये अंक पट्टी आणि गिरगीट फळ्याचा वापर करताना दिसले. खरं तर हे छोटे-छोटे बदल आमच्या प्रयत्नांचे यशच म्हणावे लागले…आपल्या कामाबद्दल दामिनी निंबर्ते भरभरून सांगत असतात. ते ऐकताना वाटते की अंगणवाडीतही किती प्रयोगशील शिक्षण देतात येतं. पुण्यातील बिलिफ संस्थेशी त्या मागील दोन वर्षांपासून फिल्ड कोॲर्डिनेटर म्हणून जोडलेल्या आहेत.
खरं तर लहान मुलांना योग्य पद्धतीनं शिकवणं, त्यांच्यावर छोट्या छोट्या गोष्टींतून संस्कार घडवणे ही खूपच महत्वाची गोष्ट. पण बरेचदा ती होताना दिसत नाही. अनेकदा पालकांना माहिती नसते म्हणून, तर कधी शिक्षकांना माहिती नसते म्हणून. पण वयाच्या या टप्प्यावरील शिक्षण आणि संस्कारांमुळेच मुले पुढे घडत असतात. त्यासाठी संबंधित अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीस यांना व्यवस्थित प्रशिक्षण सल्ला द्यायला पाहिजे. दामिनीताई हेच काम करत असतात. पुण्यातील हडपसर, मुंढवा या भागातील अंगणवाड्यांमध्ये त्या जातात. तेथील ताईंशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतात. त्यांना प्रशिक्षण आणि सल्लाही देतात. वर घडलेला प्रसंग हा अशाच शिक्षणाच्या वेगळ्या प्रयोगाचा आहे. सध्या असे छोटे-मोठे प्रयोग बिलिफ आणि दामिनीताईंसारख्या हाडाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पुण्यात अनेक अंगणवाड्यांमध्ये सुरू आहेत.
मुळच्या विदर्भातील अमरावतीच्या असलेल्या दामिनी निंबर्ते यांनी शिक्षणशास्त्रात डीएड केलं आणि नंतर संगीत शास्त्रातील बीपीए ही पदवी मिळवली. पुढे एक वर्ष जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवायचेही काम केले. पण त्यांना त्याच्याही पलीकडे जाऊन काही करायचे होते. पुढे लग्नानंतर पुण्यात आल्यावर बिलिफ संस्थेच्या माध्यमातून ती संधी त्यांना मिळाली. लहान मुले कशी शिकतात, त्यांच्यासाठी रोज कुठले उपक्रम द्यायचे अशा अनेक गोष्टी त्यांना येथे कामादरम्यान शिकायला मिळाल्या. मूळात हे कामच तसं आव्हानात्मक आहे. त्यात त्यांचा रोजचा दिवसही व्यग्रतेचा असतो. वारजेहून रोज बसने त्या हडपसर आणि मुंढवा परिसरातील सरकारी अंगणवाड्यांमध्ये जातात. त्यानंतर दुपारी पुन्हा प्रवास करून शनिपाराजवळ असलेल्या कार्यालयात जाऊन तिथे काम करतात. त्यांना सात वर्षांचा मुलगा आणि साडेतीन वर्षांची मुलगी आहे. त्यांचे रोज सकाळी आवरून निघावे लागते. अर्थात त्यासाठी त्यांच्या पतीचा त्यांना खूप आधार मिळतो. त्या कामावर असताना पती मुलांचे संगोपन करतात. अनेकदा प्रशिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. तेव्हाही पती मुलांना सांभाळून घेत असल्याचे त्या आवर्जून सांगतात.
आपल्या कामाबद्दल दामिनीताई सांगतात की लहान मुलांच्या शाळेत वर्गखोली कशी असावी याचं देखील एक शास्त्र आहे. फक्त कार्टून्स किंवा एबीसीडी, फुलं या गोष्टी रंगवलेल्या भिंती आकर्षक जरूर दिसतात, पण बालशिक्षणात त्यांचा खरंच किती उपयोग होतो? त्यापेक्षा भिंतींवर मोजक्याच गोष्टी असतील, आणि थोडी मोकळी जागा असेल तर अंगणवाडी ताईंना ते जास्त सोयीचं असतं. वर्गात मुलांसाठी त्यांच्या उंचीचा फळा सुद्धा असायला हवा, जिथे ते खडूने मुक्तपणे काहीही करू शकतील. हे सगळं आम्ही अंगणवाडी प्रशिक्षणादरम्यान नेहमीच सांगत असतो. अनेकदा या सूचनांचा उपयोगही होताना दिसतो. त्यातीलच सूचना मी एका ठिकाणी केली आणि आनंदाची बाब म्हणजे त्यांनी ती स्वीकारलीही. बरेचदा दैनंदिन कामकाजात अंगणवाडी ताईंना अडीअडचणी येतात. त्या सोडविण्याचे कामही दामिनीताई करत असतात. शिक्षणाच्या बाबतीत नवीन शिकणं आणि ते ज्ञान अंगणवाडी कर्मचाऱ्यांमार्फत छोट्या मुलांपर्यंत पोहोचविणे या बाबत त्या प्रचंड उत्सुक असतात आणि त्यासाठी मेहनतही घेतात.