शिरूर : करडे येथील माजी सैनिक पत्नीची आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे चार जणांविरोधात फिर्याद दाखल केली होती. फिर्याद दाखल केल्यानंतर 40 दिवस उलटून गेले तरी आरोपीचा थांगपत्ता पोलिसांना लागला नाही. त्यानंतर अखेर या प्रकरणातील आरोपीला शिरूर पोलीस स्टेशनचे अधिकारी मदत करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकारानंतर शिरूर पोलीस स्टेशनमधील भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन केलं असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, करडे येथील डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत एका माजी सैनिकाच्या पत्नीला भागीदारीतून काढून टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याबाबत रेश्मा राहुल वाळके यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे चार जणांविरोधात 27 जानेवारी रोजी फिर्याद दाखल केली होती. मात्र या घटनेला 40 दिवस उलटून गेले तरी यातील चारही आरोपी अद्याप फरारच आहेत. यातील आरोपींना शिरूर पोलीस स्टेशनमधील एक वरिष्ठ अधिकारी मदत करत असल्याची लेखी तक्रार माजी सैनिकाच्या पत्नीने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे केली होती. त्यानुसार आरोपीच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढून सदर कॉल डिटेल्सचे अवलोकन केले असता त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी यांनी आरोपी सचिन वाळके याला एकूण 79 कॉल्स केले असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर पोलीस हवालदार नारायण जाधव यांनीही त्यांच्या फोनवरून आरोपी सचिन वाळके याला एकूण 25 कॉल केल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस हवालदार यांनी कोणत्याही समर्थनीय कारणाशिवाय गंभीर गुन्ह्यातील आरोपी याच्या संपर्कात राहून अत्यंत बेशिस्त व बेजबाबदार गैरवर्तन केल्याचे दिसून आले. सदर प्रकरणात त्यांनी दाखवलेल्या संशयित वर्तनाबद्दल त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आल आहे.