शिरूर, (पुणे) : शिरूर तालुक्यातील चांडोह गावात ‘उमेद’ या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत पंचायत समिती व श्रमशक्ती महिला ग्रामसंघ यांनी महिलांची सर्वसाधारण सभा व हळदी कूंकू समारंभाचे आयोजन केले होते. या सभेला महिलांबरोबर गावातील पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. पंचायत समिती अंतर्गत बचत, कर्ज, परतफेड व प्रगती या अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर पंचायत समितीच्या माजी सदस्या डॉ. कल्पना पोकळे यांनी ‘महिलांचे आरोग्य’ या विषयावर चर्चा सुरू केली आणि विषयाला रंगत आली.
डॉ. कल्पना पोकळे म्हणाल्या की, कुटूंबाकडे लक्ष देत असताना महिला आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्या वारंवार आजारी पडतात. त्यातून मोठ्या आजाराची लक्षणे त्यांच्या शरीरावर परिणाम करतात. या सभेत महिलांमध्ये कोणी आजारी आहात का? असे विचारल्यावर कोणीही उत्तर दिले नाही. त्यावर त्या म्हणाल्या की, महिलांना नेहमी थकवा जाणवणे, केस गळणे, अशक्तपणा अशा आजारांची लक्षणे दिसत असतात. त्यामुळे २४ तासांतून २४ मिनीटे का होईना, महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे.
हिमोग्लोबीन कमी असणे हे देखील आजाराचे लक्षण आहे. शेतात आपन भुईमूग पेरतो. मग आपल्या घरातील गुळ व शेंगदाणे खावेत. सकस आहार नेहमी घ्यावा. मोड आलेली धान्ये आहारात असावीत. सेंद्रिय फळभाज्या तयार करून त्या आहारात याव्यात. व्यायाम व आहाराकडे महिलांनी लक्ष दिल्यास महिलांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यास मदत होईल.
खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष संपत पानमंद म्हणाले की, महिलांची ‘मशेरी’ लावण्याची सवय घातक आहे. त्याबाबत बोला काहीतरी… यावर पोकळे म्हणाल्या की, मशेरी हे देखील एक व्यसन आहे. महिला कंटाळा घालवण्यासाठी हे व्यसन करत असतात. पण हळूहळू हे व्यसन देखील बंद होऊ शकते. त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आजकाल तरूण महिलांच्या मुखावरचे हास्य व पांढरेशुभ्र दात पाहिल्यावर त्यांना मशेरीचे व्यसन नाही, याबाबत समाधान वाटते. ही आनंददायी गोष्ट आहे.
दरम्यान, पुरूषांच्या व्यसनाचा देखील कुटूंबावर परिणाम होत असतो. पुरूषांनी देखील व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. पुरूष वर्गाच्या व्यसनाधिनतेबाबत ‘ती’च्या बरोबर ‘तो’ही तेवढाच जबाबदार आहे, असे म्हटल्यावर पुरूषांचा चेहरा पहाण्यासारखा झाला होता.