शिरूर : जनावरांसाठी विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून पाण्यात पडल्याने महिला सरपंचाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.10) सायंकाळी घडली. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.
नागरगाव (ता. शिरूर) ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगल शरद शेलार (वय ४२) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या महिला सरपंचाचे नाव आहे. जनावरांकरिता विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून त्या विहिरीत पडल्याने ही दुर्घटना घडली. याप्रकरणी त्यांचे दीर अशोक शेलार यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरपंच मंगल शरद शेलार या नागरगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच होत्या. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जनावरांकरिता पाणी काढण्यासाठी घरामागील विहिरीवर गेल्या होत्या. सुमारे एक तास उलटूनही त्या घरी न आल्याने कुटुंबीयांनी शेताकडे व शेतातील विहिरीकडे त्यांचा शोध घेतला. मात्र, त्यांचा ठावठिकाणा न लागल्याने त्या विहिरीत पडल्या असाव्यात, असा संशय आल्याने कुटुंबीयांनी व आसपासच्या लोकांनी मोटारी लावून विहिरीतील पाणी उपसले. रात्री सातच्या सुमारास विहिरीतील सर्व पाणी उपसल्यानंतर विहिरीत त्या मृतावस्थेत आढळून आल्या.
दरम्यान, पोलिसांनी सदर घटनेत आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम हे करत आहेत.
मोटारीने पाणी काढून दिले जाते जनावरांना
शेलार यांच्या शेतातील या विहिरीला बाजूला दगडी पायऱ्या असून, मोटारीने पाणी काढून ते हौदात सोडून जनावरांना दिले जाते. वीजपुरवठा खंडित असल्यावर विहिरीतील पायऱ्यांवर उतरून दोरीला बादली बांधून जनावरांसाठी पाणी काढले जाते.