माळेगाव : पतीचा अंत्यविधी उरकून पत्नी व मुलाने मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याची घटना गोफणेवस्ती, माळेगाव येथे घडली आहे. माळेगाव येथील कुरण विभागातील मदनेवस्ती येथील पोपट शंकरराव मदने (वय ६३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. बारामती मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान होते.
मात्र, घरातील कर्ता पुरुष गेल्यावर व दुःखाचा प्रसंग असताना त्यांना मतदान करण्यासाठी आग्रह करणे उचित वाटत नव्हते. अखेर पोपट मदने यांच्या पत्नी सविता मदने, मुलगा आकाश मदने यांनी गोफणेवस्ती येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. एवढ्या दुःखद प्रसंगी पतीच्या निधनाचे दुःख बाजूला सारून धैर्य दाखवून मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मदने कुटुंबाचे प्रशासनासह ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.