थेऊर (पुणे) : दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत थेऊर (ता. हवेली) येथील ३७ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आव्हाळवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील आव्हाळवाडी फाटा येथे मंगळवारी (ता. ०७) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
संगीता बाळासाहेब कांबळे (वय ३७ रा. थेऊर, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आर्यन कांबळे हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी आर्यन कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणीकंद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता कांबळे या वाघोलीमध्ये कामाला होत्या. दररोज प्रमाणे थेऊर येथील घरून त्या निघाल्या होत्या. मंगळवारी सकाळी पाऊणे सात वाजण्याच्या सुमारास आव्हाळवाडी फाटा येथे आल्या असता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत त्या जमिनीवर पडल्या.
त्याचवेळी पाठीमागून आलेले वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या, तर दुचाकीवरील त्यांचा मुलगा आर्यनला किरकोळ दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी लोणीकंद पोलीसांनी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, त्यांच्या पश्चात सासू, पती, एक मुलगा, एक मुलगी, दीर, जाऊ असा मोठा परिवार आहे. थेऊर (ता. हवेली) येथील पोलीस पाटील रेश्मा कांबळे यांच्या संगीता कांबळे या जाऊबाई होत.