उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावर कोरेगाव मुळ हद्दीतील इनामदार वस्तीवर मद्यधुंद बलेनो कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या एका बाजूने चालणाऱ्या दुचाकीसह रस्त्यालगतच्या नर्सरीमधील टेम्पोला धडक दिली. या तिहेरी विचित्र अपघातात इनामदार वस्तीजवळील आकाश रोझ नर्सरीच्या वयोवृध्द मालकिणीच्या मृत्यु झाला. तर दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले आहेत.
स्मिता ज्ञानेश्वर शिंदे (वय- 61, रा. इनामदारवस्ती, कोरेगाव मूळ, ता. हवेली) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तर विजू राजू थोरात (वय- ४०) व नाना लबडे (वय – ४५, रा. दोघेही हिंगणगाव, ता. हवेली) हे दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले आहेत. हा विचित्र अपघात आज (मंगळवार) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडला आहे.
याप्रकरणी सुनिल बापु शिंदे वय 37, व्यवसाय – शेती, रा. इनामदारवस्ती, कोरेगाव मुळ ता. हवेली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाहनचालक राजेंद्र गोपीनाथ मारणे (वय 56 रा. 211 गणेषखिंड रोड, खैरेवाडी पुणे 16 याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अशी माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, इनामदार वस्तीवर पुणे-सोलापुर महामार्गालगत आकाश रोझ नर्सरी नावाची नर्सरी आहे. या नर्सरीत कामगारांच्या माध्यमातून रोपे टेम्पोत भरण्याचे काम सुरु होते. तर रस्त्यात दुचाकी बंद पडल्यने विजू थोरात व व नाना लबडे हे उरुळी कांचन बाजूकडून लोणी कळभोरकडे आपली दुचाकी ढकलत निघाले होते. याच दरम्यान मारुती कंपनीची बलेनो ( MH 12 PC 3691) कार भरधाव वेगात उरुळी कांचन बाजूकडून लोणी काळभोर येत होती. या कारच्या चालकांचे नियंत्रण सुटल्याने, कारने विजू थोरात व व नाना लबडे ढकलत असलेल्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर ती कार त्याच वेगात आकाश नर्सरीत शिरली.
दुचाकीच्या अपघातानंतर नर्सरीत शिरलेल्या भरधाव बलेनो कारने रोपे भरत असलेल्या टेपोमला एका बाजुने जोरधार धडक दिली. तसेच टेम्पोच्या जवळ उभ्या असलेल्या स्मिता शिंदे यांनाही धडक दिली. या धडकेमुळे शिंदे यांचा एक हात तुटून एका बाजूला पडला, तर त्या दुसऱ्या बाजुला कोसळल्या. अपघात झाल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरीकांनी या अपघातातमधील तीनही जखमींना दोन वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, स्मिता शिंदे यांना कारची जोरदार धडक बसल्याने, त्यांचा उपाचार सुरु करण्यापुर्वीच मृत्यु झाल्याचे विश्वराज हॉस्पिलच्या डॉक्टरांनी जाहीर केले.
नर्सरीमधील कामगाराचा चोवीस तासांपूर्वीच अपघातात मृत्यू
आकाश रोझ नर्सरीच्या वयोवृध्द मालकीण स्मिता शिंदे यांचा वरील अपघातात मृत्यू झाला. तर याच नर्सरीमधील साकुलाल पचुवा केवट या ३३ वर्षीय परप्रांतीय कामगाराचा रविवारी (ता. ७) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्द्दीतील चिंतामणी हॉस्पिटल शेजारीच अपघातात मृत्यू झाला आहे. चोवीस तासांच्या आत नर्सरीच्या मालकीण व कामगार यांचा अपघाती मृत्यू झाल्याने कोरेगाव मुळ परीसर दुःखात बुडाला आहे.