पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरटांनी एका महिलेची १७ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ९) गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार महिला वडगाव शेरी भागात राहायला आहे. सप्टेंबर महिन्यात चोरट्यांनी महिलेच्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठविला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी तिला दाखविले.
सुरुवातीला चोरट्यांनी महिलेला काही रक्कम गुंतविण्यास सांगितले. महिलेने रक्कम गुंतविल्यानंतर चोरट्यांनी तिला परतावा दिला. परतावा दिल्याने महिलेचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. त्यानुसार, गेल्या तीन महिन्यांत महिलेने वेळोवेळी १७ लाख ७० हजार रुपये चोरट्यांच्या बँक खात्यात जमा केले. त्यानंतर चोरट्यांनी मोबाइल क्रमांक बदलले.