हिंजवडी: माझ्या नवऱ्याला सारखा फोन करू नको, असे समजावण्यासाठी गेलेल्या एका महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच संबंधित महिलेच्या कारची तोडफोड केल्याची घटना १७ एप्रिल रोजी दुपारी हिंजवडी फेज तीन परिसरात घडली. या प्रकरणी मारहाण झालेल्या महिलेने एका महिलेच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही फिर्यादी महिलेच्या पतीला सतत फोन करून प्रेमाच्या जाळ्यात ओढत असल्याने फिर्यादी तिला समजावण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी महिलेने फिर्यादी यांना शिवीगाळ करत स्टीलच्या बाटली डोक्यात मारली. तसेच मानेच्या मागे चावा घेत त्यांना दुखापत केली. तसेच शरीरावर नखे मारून ठिकठिकाणी ओरखडले. फिर्यादी महिलेचे मंगळसूत्र देखील तोडले. तसेच कारची काच फोडून मोठे नुकसान केले. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.