दौंड, (पुणे) : शहरातील महादेव मंदिरात दानपेटी फोडून रोकड लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला दौंड पोलिसांनी रोख रकमेसह ताब्यात घेतले आहे. मंगळवारी (ता. 01) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दौंड रेल्वे स्टेशन जवळ शिशु विकास शाळेजवळ असलेल्या महादेव मंदीरात हि घटना घडली होती.
सुवर्णा सतिवान जाधव (वय 40, रा. वडारगल्ली दौंड, ता. दौड) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून पोलिसांनी 9 हजार 131 रुपयांची रोख रक्कम जप्त केली. याप्रकरणी करणसिंग मानसिंग नगरे (वय 30, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. गोपाळवाडी रोड, दौंड) यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड रेल्वे स्टेशन जवळ शिशु विकास शाळेजवळ महादेव मंदीर आहे. या महादेव मंदिरात आरोपी सुवर्णा जाधव हिने उघड्या दरवाजाच्या मार्गाने प्रवेश केला. तिने मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील 9 हजार 131 रुपयांची रोकड लंपास केली. मात्र, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी तिला जागीच पकडून दौंड पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून चोरीला गेलेली संपूर्ण रक्कम हस्तगत केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.