शिरूर : यंदा फाल्गुन महिन्याच्या सुरवातीपासून कडक उन्हाळा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. फेब्रुवारीच्या सरते शेवटी उन्हाचा चटका वाढला आहे. सोमवार ( ता. २४ ) तापमानाने ३५ अंशाचा टप्पा गाठला आहे. शुक्रवारपर्यंत ( ता. २७ ) तापमान ३७ अंशावर पोहचण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
शिरूर तालुक्याच्या भागात जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यात थंडी पसार होण्यास सुरवात होते. साधारण मकर संक्रातीनंतर उन्हाचा चटका जाणवण्यास सुरवात होते. यावर्षी फारशी थंडीही जाणवली नाही. त्याचा परिणाम शेतपिकांवर दिसू लागला आहे.
रब्बी हंगामात हळू हळू वाढणारी थंडी पिकांना फलदायी ठरत असते. मात्र या वर्षी जाणवणारी थंडीही फारसी पिकांकरिता लाभदायक ठरली नाही. गेल्या काही वर्षापासून फेब्रुवारी महिन्यापासून कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. यंदाही तापमान वाढीची परंपरा कायम असून सोमवारी कमाल तापमान ३५ अंश तर किमान १७ अंश सेल्सिअस होते. हवेतील आद्रता २५ टक्के होती. उकाडा जाणवत होता. सध्या रात्रीच्या वेळी वातावरणात उकाडा जाणवत असून पहाटे हल्की थंडी जाणवते.
सकाळी मात्र सुर्य दर्शनापासून उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. त्यामुळे सकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या देखील कमी झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनूसार, येता काळात तिन चार दिवसात तापमान ३७ अंशाचा टप्पा गाठू शकतो. या काळात किमान तापमान देखील २० ते २१ अंशाचा आसपास जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मार्चच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा उंचावर जाण्याची शक्यता आहे.
सध्या गावागावात तसेच रस्त्याच्या कडेला आईस्क्रिम, ऊसाचा रस आणि शितपेय दुकाने थाटली गेली आहेत. वातावरणात जाणवणार उकाडा तसेच उन्हाने जिवाची लाहीलाही होत असताना थंडाईसाठी या दुकानांचा आधार प्रवासी घेताना दिसतात. त्यामुळे शेतपेयांच्या दुकानात गर्दी वाढू लागली आहे. उन्हाळ्यात यंदा पाण्याचे संकट येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नदीला, तलावात, कालव्याला सोडलेले पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. नदीकाठी असणाऱ्या शेतकरी किंवा नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश वायसे यांनी केले आहे.