उरुळी कांचन : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा आदर ठेवीत महायुतीतून त्यांना मदत करण्याची भूमिका ठेवली होती. परंतू ते निवडणूक लढविणार नसतील तर संघटनात्मक पातळीवरील ताकद व अनुकूल परिस्थितीने भाजपला ही जागा सोडावी, असे मत शिरुरचे भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख प्रदिप कंद यांनी व्यक्त केले आहे. ते शुक्रवार (दि.२४) सायंकाळी पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी ‘यशवंत’ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, क्रीडा आघाडीचे पै. संदीप भोंडवे, हवेली तालुकाध्यक्ष शाम गावडे, शिरूर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, कामगार आघाडीचे जयेश शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, भाजपला ही जागा सोडली नाही, तर स्वाभाविकपणे भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा माझ्यावर मैत्रिपूर्ण अथवा स्वतंत्ररीत्या निवडणूक लढविण्याचा दबाव असून या संदर्भातील वरिष्ठांना मी माझ्या भावना कळविल्या आहे. तसेच येत्या रविवारी समर्थकांची बैठकीत निर्णय घेऊन निवडणूक लढविणार की नाही ? याचा निर्णय घेणार असल्याची स्पष्टोक्ती प्रदिप कंद यांनी दिली.
पुढे म्हणाले कि, मतदारसंघ पारंपारीक असल्याने व या लोकप्रतिनिधींच्या कामगिरीची नाराजीची भावना लक्षात घेता भाजपला अधिक संधी आहे. मतदारसंघ जनसंघाच्या काळापासून भाजपकडे असल्याने या मतदारसंघात एक मोठा जणाधार पक्षाला आहे. पक्षाची संघटना मजबूत असल्याने महायुतीत हा दावा प्रबळ होता. त्यामुळे निवडणूक लढविण्याची शिरूर-हवेली कोअर कमिटीची भूमिका आहे. या भूमिकेवर येत्या रविवारी कार्यकर्ता मेळावा घेऊन निर्णय घेणार असल्याचे प्रदिप कंद यांनी स्पष्ट केले आहे.
संदीप भोंडवे म्हणाले कि, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भावना असून, ही निवडणूक थेट लढली जावी म्हणून भाजपचे मतदारसंघातील ८० टक्के कार्यकर्ते एकमतावर आहेत. त्यामुळे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने मैदानात उरणार आहेत, असे पै. संदीप भोंडवे यांनी यावेळी सांगितले.