पुणे : रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अपघातातील बळी रोखण्यासाठी प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या. दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटसक्ती करण्यात आली. पुण्यात हेल्मेटसक्तीला जोरदार विरोध करण्यात आला. आजही मोठ्या प्रमाणात दुचाकीचालक विना हेल्मेट पाहायला मिळत आहेत. आता पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आला आहे. पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच हेल्मेटबाबात भूमिका मांडली आहे. आता वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच हेल्मेट वापराबाबत जागृती करण्यात येणार असल्याचे कुमार यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची बदली करण्याचे आदेश गृह विभागाने बुधवारी सायंकाळी दिले. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेले दोन महिने पुणे पोलीस दलातील सह पोलीस आयुक्तपद रिक्त होते. सहपोलीस आयुक्तपदी कोकण परीक्षेत्राचे महानिरीक्षक प्रवीण पावर यांची नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान, या आदेशानंतर अमितेशकुमार यांनी आज पुण्याचे पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बेसिक पोलिसिंग, व्हिजीबल पोलिसिंग, लॅा अँड ॲार्डर, ट्रॅफिक, महिला बाल सुरक्षा, व्हीआयपी सिक्युरिटी, सायबर गुन्हे हे महत्वाचे कामाचे मुद्दे असतील, असे अमितेश कुमार म्हणाले. तर हेल्मेटबाबत प्रश्न विचारला असता हेल्मेट कंपल्सरी असणे हा कायदा आहे आणि कायद्याचे पालन झाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही. गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.
बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. महिला, महाविद्यालयीन तरुणी, शाळकरी मुलींच्या सुरक्षेस प्राधान्य देण्यात येणार आहे. भररस्त्यात कोयते उगारून दहशत माजविणे, अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत सहभाग, तसेच सराइतांवर वचक ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करून उपाययोजना करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.