पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि पक्षचिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर आता त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटत आहेत. हा वाद आता राज्यातील कार्यालयांमध्ये गेला आहे. पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या दर्शनी भागावरुन घड्याळ हे पक्षचिन्ह आणि नाव काढून टाकल्यानंतर कार्यकर्ते भावनिक झाल्याचे चित्र पहायला मिळाले. परंतु आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर अजित पवार गट दावा करण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर शहरात एकमेकांना पेठे भरवत जल्लोष करण्यात आला. अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी देखील विजयी गुलाल उधळला. त्यानंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावरील घडाळ्याचे चिन्ह काढून टाकले. या क्षणी नेते आणि कार्यकर्ते भावूक झाले होते. आता मात्र शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर अजित पवार गट दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र पुण्यातील शहर कार्यालय प्रशांत जगताप यांच्या नावावर असल्यामुळे अजित पवार गटाला कायदेशीर दावा करता येणार नाही, अशी माहिती मिळत आहे. ही जागा जगताप यांनी भाडेतत्त्वावर घेतलेली असल्यामुळे अजित पवार गटाला दावा करता येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्येदेखील वादावादी होण्याची शक्यता गृहित धरून शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर किमान राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात वाद विकोपाला जाणार नाही याची अपेक्षा होती. मात्र, असं होताना दिसलं नाही. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पुण्यातील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाच्या मालकीवरुन दोन्ही पक्ष एकमेकांवर भिडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या पक्षकार्यालयाला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या करारनाम्याच्या आधारे हे पक्ष कार्यालय भाडेतत्वावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतले होते. मात्र, फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने हे कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शरद पवार गटाने दाद दिली नाही. पक्ष आणि पक्ष चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर या पक्ष कार्यालयात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी शिरण्याचा आणि पक्ष कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या कार्यालयावर राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह लावण्यात आले आहे. अजित पवारांच्या हस्ते या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. ती पाटीदेखील काढून टाकण्यात आली. त्यामुळे अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.