अरुण भोई
दौंड, (पुणे) : दौंड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने स्वतः च्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दौंड येथील सरपंचवस्ती येथे असलेल्या त्यांच्या घरात घडली. अश्विनी विशाल शिंदे (वय-३२) असं खून करण्यात आलेल्या महिलेच नाव आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
याबाबत महेंद्र बळीराम जगताप (वय-६७ रा. पंचशिल थिअटर पाठीमागे, जाधव चाळ, दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून महिलेचा पती विशाल दौलत शिंदे (रा. सरपंचवस्ती, माने हॉस्पीटलसमोर, दौंड) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड येथील सरपंचवस्ती येथे आरोपी पती आणि फिर्यादी यांची मुलगी राहतात. त्यांच्या राहत्या घरात आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीला कौटुंबिक वादातून मारहाण करून तिचा गळा दाबून खून केला. या घटनेची माहिती मिळताच फिर्यादी यांनी दौंड पोलीस ठाण्यात धाव घेत जावई विशाल शिंदे याच्याविरूध्द कायदेशीर फिर्याद दिली.
त्यावरून आरोपी पतीवर खुनाचा गुन्हा दखल करून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीला २३ एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास दौंड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके करत आहेत.