नारायणगाव, (पुणे) : पुणे जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. व्यसनाधीन पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने पतीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.९) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील औरंगपूर येथे घडली. देवराम सोमा डुकरे (वय ५४, रा. औरंगपूर) असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या प्रकरणी देवाराम डुकरे यांची मुलगी रंजनी गांजवे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आरोपी दीपाली देवराम डुकरे (वय ४८) या महिलवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवराम डुकरे आणि त्याची पत्नी दीपाली हे दांपत्य आपल्या विवाहित मुली सोबत औरंगपूर येथील खंडोबामाळ येथे राहत होते. देवराम डुकरे यांना दारूचे व्यसन होते. यावरून या दोघामध्ये सतत भांडणे होत होती. दारूसाठी पैसे मिळावे यासाठी तो दिपालीला मारहाण करत असे.
दरम्यान, सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास देवराम डुकरे हा दारूच्या नशेत घरी आला.
नेहमीप्रमाणे त्यांनी पत्नी दीपालीशी भांडण करण्यास सुरुवात केली. मला दारू प्यायला पैसे दे असा तगादा त्याने दिपालीकडे लावला. मात्र, दीपालीने पैसे देण्यास नकार दिला. याच रागातून त्याने पत्नी दिपालीला मारहाण करण्यास सुरुवात केली. रोजच्या त्रासाला कंटाळून दीपालीने पती देवरामच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. रॉडचा घाव वर्मी बसल्याने देवराम यांचा जागेवरच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच आज सकाळी सात वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. सध्या आरोपी पत्नीला ताब्यात घेतले असून, तिची कसून चौकशी केली जात आहे. त्यामध्येच तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहेत.