पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला पुणेकरांनी अभुतपूर्व प्रतिसाद दिला. या महोत्सवात पुस्तकांच्या तब्बल साडेआठ लाख प्रतींची विक्री झाली असून, सुमारे ११ कोटींची उलाढाल झाली. त्यामुळे पुस्तके आणि वाचनाशी संबंधित चार विश्वविक्रम नोंदवलेल्या या महोत्सवात पुस्तक विक्री उच्चांकी ठरली. यावर्षीचा प्रतिसाद पाहता पुढील वर्षी देखील हा महोत्सव असाच धुधडाक्यात आयोजित करणार असल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी दिली.
राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे (एनबीटी) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव झाला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेते प्रवीण तरडे, एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. विजय खरे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप झाला. या महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्यविषयक चर्चांना पुणेकरांनी उत्स्फूर्त हजेरी लावतानाच मोठ्या प्रमाणात पुस्तक खरेदीही केल्याचे स्पष्ट झाले.
समारोपप्रसंगी आकाशात फुगे सोडण्यात आले. या महोत्सवाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महापालिका, उच्च शिक्षण, शालेय शिक्षण आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी खडकी शिक्षण संस्था, कृष्णकुमार गोयल, सूर्यकांत काकडे ग्रुप, पंचशील ग्रुप, डी. वाय. पाटील समूह, लोकमान्य ग्रुप, पुनीत बालन ग्रुप, कोहिनूर ग्रुप, सुहाना ग्रुप, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आदींचे विशेष सहकार्य लाभले.
या पुस्तक महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पुस्तक महोत्सवाला सुमारे साडेचार लाख नागरिकांनी भेट दिली. पुस्तक विक्रीतून सुमारे ११ कोटींची आर्थिक उलाढाल झाली. या महोत्सवाला भेट देणाऱ्या आणि पुस्तकांची खरेदी करणाऱ्यांमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक होती. या पुस्तक महोत्सवात नरेंद्र मोदीलिखित ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकाच्या ८७ हजार प्रती, तर शिवराज्याभिषेक पुस्तकाच्या ६९ हजार प्रती वितरित करण्यात आल्या. पुणे ही पुस्तकांची राजधानी होण्यासाठी महापालिकेबरोबर प्रयत्न केले जातील. तसेच वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी एनबीटीचे पुण्यात केंद्र स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले.
या महोत्सवात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पुस्तके खरेदी करत होते. त्यामुळे मुले वाचत नाही असे म्हणणे मला अजिबात पटले नाही. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर १० ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सवात पुणे पुस्तक महोत्सवाची माहिती देणारे दालन असेल. पुणे पुस्तक महोत्सवाच्या प्रसार-प्रचारासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी सांगितले.
या महोत्सवाच्या संयोजन सामितीत प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर, अॅड. मंदार जोशी, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, राहुल पाखरे, शैलेश जोशी, संजय मयेकर, मिलिंद कुलकर्णी आदींनी महोत्सव यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.