अक्षय मंडलिक / बारामती (पुणे) : ‘बिग बॉस मराठी ५’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोचा ग्रँड फिनाले रविवारी (६ ऑक्टोबरला) दणक्यात पार पडला. बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांना ‘गुलीगत’ धोका देत बारामतीचे सुपुत्र आणि रीलस्टार सूरज चव्हाणने आपला जलवा दाखवत या सीझनची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली आहे, तर गायक अभिजीत सावंत उपविजेता ठरला आहे. सूरजने हा शो जिंकल्यानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एका रीलस्टारने ‘बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकली आहे, त्यामुळे सूरजने लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
तसेच एसक्यूआरक्यूझेडक्यू, ललालीलालालाला, गुलीगत, बुक्कीत टेंगूल, झापुक झुपुक असे अनेक डायलॉग त्याचे सोशल मिडीयावर फेमस झाले आहेत. या त्याच्या बोबड्या बोलाने तो संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्याने अनेक वेबसिरीजमध्ये काम देखील केलं आहे. स्वतःचे दुख, परिस्थिती मनात ठेवून प्रेक्षकांना खळखळून हसवत सुरज बिग बॉसचा हिरो तर ठरलाच आहे. मात्र, बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी सूरजचा संघर्षमय प्रवास आपण जाणून घेऊयात.
कोण आहे बिग बॉस विजेता सूरज चव्हाण?
गुलिगत धोका फेम सुरज चव्हाण हा बारामती तालुक्यातील मोढवे गावचा रहिवासी आहे. सूरज हा गरीब कुटुंबातील सातवी पास असलेला हरहुन्नरी कलाकार. सूरजचे वडील शेळ्या पाळत होते व त्यांचा सांभाळ करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. काही वर्षापूर्वी त्यांचा कर्करोगाने मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या आईचेदेखील निधन झाले.
त्यानंतर त्याची आत्या कल्पना जाधव, बहीण सीता खोमणे आणि इतर कुटुंबीयांनी त्याचा सांभाळ केला. अत्यंत गरीब परिस्थितीतून वर येत सूरज चव्हाणने स्वतःच अस्तित्व निर्माण केलं आहे. सुरजने वेळप्रसंगी माथाडी कामगाराचं काम देखील केलं आहे. तसेच रोजंदारी, कोंबडखत भरणे, मजुरी करून उदरनिर्वाह करणे अशा पद्धतीची कामे सुरज करतो.
छोटे-छोटे कॉमेडी व्हिडीओ तयार करून सुरजने टिकटॉकवर प्रसिद्धी मिळवली आहे. सूरजचे भाच्यांनी त्याला व्हिडिओ बनवण्यास शिकविले आणि त्यासाठी मदत देखील केली. सूरजचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यानंतर त्याला दुकानांचे उद्घाटन, वाढदिवस व इतर कार्यक्रमांसाठी बोलवले जात होते. सूरजची मोढवे येथील मरिमाता देवीवर श्रद्धा आहे.
अन् रातोरात झाला टिकटॉक स्टार
सुरुवातीच्या काळात सूरजकडे मोबाईल घेण्यसाठी पैसे नव्हते. त्यामुळे तो इतरांच्या मोबाईलवर व्हिडिओ करायचा. काही कॉमेडी व्हिडिओ तसेच नाचतानाचे व्हिडिओ त्याने बनवले. त्यातील काही व्हिडिओंनी त्याला रातोरात टिकटॉक स्टार बनवले. त्याचे फोलोअर्स, व्ह्यूज लाखो तसेच मिलियनमध्ये गेले. आताही बिग बॉसमध्ये सूरजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. एसक्यूआरक्यूझेडक्यू, ललालीलालालाला, गुलीगत, बुक्कीत टेंगूल, झापुक झुपुक, मी ली बेक्कार, लाजली बग, हसली बग असे अनेक डायलॉग त्याचे सध्या गाजत आहेत. त्याच्या या डायलॉगवर अनेक गाणी देखील सध्या धुमाकूळ घालत आहेत.
सोशल मीडियाच्या दुनियेत लोकप्रिय झाल्यानंतर सूरजने मराठी चित्रपटातही काम केलं. राजा राणी आणि मुसंडी यामध्ये सूरजने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सूरजचे इन्स्टाग्रामवर 2 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. याच त्याच्या कर्तुत्वावर सुरजने ‘बिग बॉस मराठी पाच’ या सीजनमध्ये एन्ट्री केली, आणि तिथेही त्याने अख्खा महाराष्ट्र हसवला. त्याच्या साधेपणाने त्याने सगळ्यांची मन जिंकली. आपल्या वागण्यामुळे, प्रत्येकाचा आदर करण्याच्या सवयीमुळे, टास्कमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राने सुरजला डोक्यावर घेतले. अखेर सगळ्या अडचणींचा सामना करत सूरज आता ‘बिग बॉस मराठी पाच या सीजन’चा विजेता ठरला आहे.
बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर एवढे मिळाले मानधन
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस मराठी पाचच्या सीजनमध्ये सूरजला प्रत्येक आठवड्याला 25 हजार रुपयांचं मानधन मिळालं आहे. बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर सूरजला 14.60 लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. त्यानंतर या कार्यक्रमाचे स्पॉन्सरर पु.ना. गाडगीळ यांच्याकडून सूरज चव्हाणला 10 लाख रूपये जाहीर करण्यात आले आहे. तसेच त्याला एक इलेक्ट्रीक बाईकही बक्षीस म्हणून देण्यात आले आहे.