पुणे : आंबेगाव तालुक्यातील गिरवली जवळील आयुका केंद्रावरून परत येताना शाळेच्या बसला अपघात झाला. ही बस १०० फूट दरीत कोसळून हा अपघात झाला. या बस मध्ये 44 मुले व ५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण ४९ जण होते. ४४ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. ४ शिक्षक व ड्रायव्हर जखमी झाले आहेत.हा अपघात दोनच्या सुमारास झाला असल्याचे सरपंच संतोष सैद व अनिल सैद यांनी सांगितले.
पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशाला या हायस्कूलचे ते विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना घोडेगाव ग्रामीण रुग्णालय व मंचर उपजिल्हा रुग्णालयात किरकोळ उपचार करण्यात आले. गंभीर रुग्णाना पुणे येथे हलवण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांना तपासणी करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही मुले आयुका केंद्रावर दुर्बीण पाहण्यासाठी शालेय अभ्यासासाठी साठी गेले होते.पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी पोलिसांच्या मदतीने व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मुले बाहेर काढून घोडेगाव व मंचर येथील दवाखान्यात हलवले.आंबेगाव विद्या विकास मंडळ या संस्थेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल होऊन मदत केली.
तहसीलदार रमा जोशी , गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, संस्थेचे अध्यक्ष अजित काळे ,माजी सभापती कैलास बुआ काळे, वळसे पाटील यांचे पीए रामदास वळसे पाटील हे देखरेख ठेवून मदत करत होते