युनूस तांबोळी
शिरूर : ‘कुटूंब नियोजन’ कायदा केला मात्र जुन्या पारंपारिक विचारांनी स्त्री जन्माला नेहमीच दुय्यम दर्जा मिळाला आहे. पुरूष लिंगानेच कुटूंबाचे कर्तेपण संभाळावे या उद्देशाने स्त्री लिंग असणाऱ्या मुलींवर अन्याय होताना दिसू लागला आहे. कुटूंबाला दिवा हवा पण पणती नको… या स्थितीतच ‘नकोशी’ चा जन्म झाला. ही ‘नकोशी’ बेवारस ठिकाणी टाकली जाऊ लागली. समाज मन हेलावून सोडणाऱ्या या घटना ‘ती’वर अन्याय करणाऱ्या ठरू लागल्या आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी समाजात जागृती होईल का? बिबट्याची दशहत आणि कडाक्याच्या थंडीत मी का झाले ‘नकोशी’ असा सवाल तो कोवळा जीव तर विचारत नसेल ना?
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यात स्त्री अर्भकाला बेवारस टाकून देण्याच्या घटना घडल्या. तब्बल तीन ठिकाणी नवजात अर्भक सापडल्याने समाजातील विकृतीचे दर्शन घडू लागले आहे. परिस्थिती माणसाला चुकीच्या गोष्टी करण्यास भाग पाडते. असे म्हटले जाते. पण कुटूंब नियोजन करताना परिस्थितीचा विचार करणे गरजेचे आहे.
जन्म देणाऱ्या अपत्यांना अन्न, वस्त्र, निवारा देण्यास आपन सक्षम आहोत की नाही. याबाबत विचार झाला पाहिजे. अनेकवेळा दोन पेक्षा अधिक मुली जन्माला घातल्यानंतर परिस्थितीचा विचार होतो. त्यावेळी जन्माला आलेले स्त्री अर्भक कुठे तरी बेवारस ठिकाणी टाकण्याची बुद्धी सुचते. गरीब परिस्थिती जरी असेल तरी महिलांनीच या बाबत योग्य विचार करणे गरजेचे आहे. त्यातून ‘ती’ वरचा अन्याय दूर होण्यास मदत होईल.
दोन अपत्ये बरे म्हणत अनेकांनी कुटूंब मर्यादित ठेवण्याची संकल्पना सत्यात उतरवली. पण यामध्ये अनेक कुटूंबातून ‘ती’चा गर्भपात करण्याचा कल वाढला. त्यातून महिलांच्या आरोग्याच्या समस्या वाढलेल्या पहावयास मिळाल्या. विज्ञान क्षेत्रात झालेल्या प्रगतीने बहुतेक स्त्री अर्भक नाहीसे करण्यात आल्याच्या घटना घडल्या. या काळात वैद्यकिय क्षेत्रात अनेकांनी व्यवसायाला चालना देऊन अर्थकारण मजबूत केले. त्याचा परिणाम दर हजारी पुरूषामागे ९१२ स्त्रीया अशी आकडेवारी दिसू लागली.
या गोष्टीचा परिणाम झालेला पहावयास मिळतो. विवाहासाठी मुलगीच मिळत नसलेल्या तक्रारी समोर आल्या आहेत. अनेकवेळा दलालांची मदत घेऊन विवाह जुळविण्याची काम होऊ लागले. त्यामुळे मध्यस्थी मोठ्या प्रमाणात अर्थकारण करू लागल्याच्या घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसा देऊन विवाह केला पण विवाहित महिला पळून गेल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे त्यातून ‘ती’ ची बदनामी झालेली पहावयास मिळते.
तरूण वयात लग्न व्हाव. अशी प्रत्येकाची इच्छा असते. स्त्री – पुरूषाच्या दरीमुळे अनेकांना हवा तसा जोडीदार मिळत नाहीत. त्यातून कौटुंबिक समस्या निर्माण होतात. पोडगी, घटस्फोट यासारखे विभक्त होण्याचे पर्याय देखील पुढे येतात. अनेकवेळा बलात्कार, विनयभंग, गुन्हेगारी सारख्या समस्यांना यातूनच बळ दिले जाते.
लोकसंख्या नियंत्रणात न येता फक्त समाजावर पुरूष जातीचा पगडा असावा. त्यातून ‘ती’ असुरक्षित झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. स्त्री- पुरूष आकडेवारीच्या दरीमुळे पोलिस यंत्रणेवर देखील सुरक्षीततेचा ताण येऊन पोलिस खात्याला निर्भया सारखे पथक तयार करावे लागले आहे.
पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी नवजात अर्भक बेवारस सापडण्याच्या घटना होऊ लागल्या आहेत. नुकतेच आंबेगाव तालुक्यात मंचर, चास येथे बेवारस अर्भक सापडल्याच्या घटना घडली. त्यातनंतर जुन्नर तालुक्यात पिंपळगाव जोगा डाव्या कालव्यातील पाण्यात १५ दिवसापुर्वी जन्मलेल्या मुलीला टाकल्याची घटना घडली. अशा या घटनांसाठी महिलामंध्ये जागृती होणे गरजेचे आहे.
नवजात बालक बेवारस टाकून देणे ही गोष्ट नवीन नाही. मात्र जन्माला घातलेल्या त्या कोवळ्या जीवाला असे बेवारस फेकणे ही घृणास्पद गोष्ट आहे. देशाच्या अर्थ संकल्पात नुकतीच अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी महिला सन्मान सेवींग सर्टीफिकीट उपलब्ध करून दिल जाणार आहे. असे घोषीत केले आहे. नवजात अर्भक टाकून देण्याच्या घटना पाहता या योजनेतून महिलांना सन्मान देऊ शकतील का? हा एक सवालच आहे.
नवजात अर्भक बेवारस टाकून देणे ही गोष्ट घृणास्पद आहे. सध्या विवाह जुळवणी करण्याकरीता विवाह संस्थानी चांगलाच पुढाकार घेतला आहे. नुकत्याच मंचर येथे शेतकरी प्रदर्शनात विवाहसंस्थानी नोंदणी केल्यावर सर्वात जास्त तरूण मुलांनी नोंद केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी महिलांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम हाती घेतले जाईल. असे अनुसया महिला उन्नती केंद्र अध्यक्षा, किरण वळसे पाटील यांनी सांगितले आहे.