पुणे : दिवाळी सणानिमित्त फटाका विक्री व साठा करण्यासाठी तात्पुरते परवाना घेण्यासाठी पुणे शहर आयुक्तालयामार्फत जाहीर सुचना जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये फटाका विक्रीची परवाने कधी, कोठे अन् कसे मिळतात? याची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर काही अटी, शर्तींसह नियमावली घालून देण्यात आली आहे.
परवाने मंजूर कोठे होणार?
(1) पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1. (फरासखाना इमारत) 2. पोलीस उप आयुक्त परिमंडळ – 2 (लष्कर पोलीस स्टेशन इमारत) 3. पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3 (एरंडवणा पो चौकीजवळ) 4. पोलीस उप आयुक्त परिमंडळ 4 (नगर रोड, बोबडी पोलीस स्टेशन जवळ), आणि 5 पोलीस उप आयुक्त परिमंडळ-5 फालोमा नगर) या कार्यालयांकडून होणार आहे. संबंधितांनी अर्ज त्या कार्यालयाकडे सादर करावेत.
कागदपत्रे?
अर्जदाराने पोलीस आयुक्त कार्यालयात चारित्र्य पडताळणी करीता व्हेरिफिकेशन ब्रांच येथे अर्ज करावेत. तसेच त्याची पोच (छायांकित प्रत) परवाना मंजुरीसाठी सादर केलेल्या अर्जासोबत जोडावी. अर्जा सोबत जागेचे लोकेशन, मोजमाप, आजुबाजुचा परिसर व रस्ते दर्शविणारा कच्चा नकाशा, जागा योग्य असल्याबाबतचा नगरपालिका अथवा ग्रामपंचायतीचा दाखला जोडावा. अग्निशामक अधिकारी यांच्याकडील ना हरकत दाखला, महानगरपालिका, आकाशचिन्ह विभागाकडील ना-हरकत दाखला, जागा मालकीची असल्यास मालकी संबंधी अथवा भाडयाची असल्यास जागा मालकाचे संमतीपत्र या बाबतची कागदपत्रे जोडावीत. गतवर्षी सध्याचे नियोजित जागी परवाना घेतला असल्यास त्याचा तपशिल व परवान्याची छायांकित प्रत जोडावी. अर्जासोबत सादर केलेल्या छायांकित प्रती नोटराईज साक्षांकित करुन सादर कराव्यात.
परवाने मिळण्याचा कालावधी?
अर्ज स्विकारण्याची मुदत दि. 16/10/2024 ते दि.25/10/2024 पर्यंत असून अर्ज सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संबंधीत परिमंडळ पोलीस उप आयुक्त यांच्या कार्यालयात स्विकारले जातील. दिनांक 25/10/2024 नंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत अथवा त्याचा विचार केला जाणार नाही.
परवाने कोठे मिळणार?
मंजूर परवाने संबंधीत पोलीस उप आयुक्त यांच्या कार्यालयातून सायं 4 ते 6 वाजे पर्यंत वाटप केले जातील. परवाना शुल्क रूपये 600/- ही संबंधित पोलीस उप आयुक्त कार्यालयांकडे रोख स्वरुपात भरण्यात यावी.
परवाने नामंजूर कधी होणार?
सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून धोकादायक ठिकाणी परवाने देण्यात येणार नाहीत. अर्जासोबत वर नमूद प्रमाणे आवश्यक माहिती दाखले व इतर कागदपत्रे जोडलेली नसतील अथवा अर्ज अपूर्ण असेल, तसेच मुदती नंतर अर्ज प्राप्त झालेल्या अर्जाचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही.
फटाके वाजविण्यास बंदी?
100 पेक्षा जास्त फटाके असलेल्या सर्व साखळी फटाका उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात येत आहे. ध्वनी निर्माण करुन आवाजाचे प्रदुषण करणा-या फटाक्यांवर रात्री 10.00 ते सकाळी 06.00 वाजेपर्यंत संपूर्ण बंदी घालण्यात येत आहे. परंतु जे फटाके विविध रंग निर्माण करतात किंवा सोडतात किंवा आवाज करीत नाहीत अश्या फटाक्यांवर निबंध घालण्याची आवश्यकता नाही. शांतता प्रभागात कोणत्याही फटाक्याचा वापर कुठल्याही वेळेत करण्यात येऊ नये, शांतता प्रभागामध्ये रूग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये यांच्या सभोवतालचे 100 मीटर पर्यंतचे क्षेत्र येते.
पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रामध्ये कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्यांपासून 10 मीटर अंतराच्या आत मुंबई पोलीस अधिनियम 1951 पोट कलम 33 यु मधील तरतुदी नुसार कोणत्याही प्रकारची शोभेची दारू अगर कोणत्याही नावाने ओळखले जाणारे फटाके फेकणे, सोडणे, उडविणे, अगर फायर बलून किंवा अग्निबाण उडविणे ही कृत्ये करण्यास मनाई आहे. सदर कलम 2 चे पोट कलम 15 अन्वये रस्त्यांत कोणत्याही महामार्ग पूल/सेतू मार्गावर नेमलेले मार्ग, सेतू कमानीवजा घाट, धक्का किंवा कोणतीही आळी किंवा वाट मग ती रहदारीची असो अथवा नसो याचा समावेश होतो. या आदेशाचे उल्लंघन जी व्यक्ती करेल तिच्यावर वरील कायदयान्वये (कलम 131 (ए) सह (ⅰ)) कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– अमितेश कुमार (पोलीस आयुक्त – पुणे शहर)