उरुळी कांचन (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ, उरुळी कांचन, टिळेकरवाडीसह परिसरात रब्बी हंगामामध्ये पोषक थंडीच्या वातावरणामुळे गव्हाचे पीक जोमात बहरले आहे. मागील महिन्यात थंडीचा कडाका जोरदार वाढल्याने गहू पिकास पोषक वातावरण मिळत होते. त्यामुळे यावर्षी उत्पादन जास्त वाढण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.
ऊसाचे क्षेत्र रिकामे झाल्यामुळे शेतकऱ्यांनी गहू पिकाला पसंती दिली. त्यामध्ये लोकवन, २१८९ आदी जातीच्या बियाणांची पेरणी करण्यात आली. यंदा गव्हाला पोषक हवामान मिळाले. त्यामुळे त्याची वाढ चांगल्या प्रमाणात झाली आहे. या परिसरात ऊसाचे क्षेत्र मोठे असल्याने ऊस गाळपासाठी गेल्यानंतर मोकळ्या झालेल्या जमिनीवर शेतकऱ्यांनी लगेच गव्हाची पेरणी केली. तसेच सध्या गव्हाच्या वाढीसाठी पोषक वातावरण असल्याने व पाणीही वेळेवर मिळत असल्याने गव्हाचे पीक जोमदार आले आहे. बहुतांश ठिकाणचा गहू निसवू लागला असून, त्यास ओंब्याही येऊ लागल्या आहेत.
सर्वाधिक ऊस पिकविणाऱ्या पूर्व हवेलीत ऊसाचे पीक गुऱ्हाळ घरावर किंवा कारखान्यावर गेल्यानंतर अतिशय कमी कालावधीमध्ये येणारे पीक म्हणून गहू पिकाकडे पाहिले जाते. मुळा-मुठा व भीमा नदीच्या पट्ट्यामध्ये सर्वाधिक गावाची लागवड केल्याचे यावर्षी दिसत आहे. अलीकडील काळामध्ये हार्वेस्टरसारखे मशीन आल्याने अवघ्या काही तासांमध्ये गव्हाचे पीक काढून धान्य घरी नेले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचा गहू पिकाकडे कल वाढला आहे.
दरम्यान, यंदा गव्हाच्या पेरण्या उशिराने झाल्या. त्यानंतर ढगाळ हवामानाचे सावट निर्माण झाले. काही ठिकाणी हलका पाऊसदेखील पडला. त्यानंतर गहू पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले. वातावरणात थंडी वाढली. ही थंडी गहू पिकाला पोषक ठरली. पोषक हवामान लाभल्यामुळे शिवारात गहू जोमाने वाढला आहे. बऱ्याच भागात गहू पोग्यावर, ओंबीवर तर काही ठिकाणी हुरड्यावर आलेला आहे.
शेतकऱ्यांची गहू पिकाला पसंती
मुळा-मुठा नदीच्या पट्ट्यामध्ये हिरवेगार गव्हाचे पीक बहरले आहे. बहुंताशी गव्हाच्या ओंबीमध्ये पुरेपुर टपोरा गव्हाचा दाणा भरला आहे. ऊस तुटून गेल्यामुळे रिकाम्या क्षेत्रात शेतकऱ्यांनी गहू पिकाला पसंती दिली आहे. गव्हाला लागणारी थंडी व पोषक वातावरणामुळे त्याची वाढ चांगल्या प्रमाणात झाली आहे.
– सचिन कड, शेतकरी, कोरेगाव मूळ, ता. हवेली.
पोषक हवामानामुळे गहू वाढला जोमाने
शेतकऱ्यांनी आजपर्यंत गहू पिकास पेरणीपासून तर हुरड्यावर येईपर्यंत वेळेवर पाणी, खते केली. पोषक हवामान लाभल्यामुळे शिवारात गहू जोमाने वाढला आहे. बऱ्याच भागात गहू पोग्यावर, ओंबीवर तर काही ठिकाणी हुरड्यावर आला आहे.
– संभाजी कांचन, शेतकरी, उरुळी कांचन, ता. हवेली.