उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन जवळ असलेल्या शिंदवणे घाटातील जंगलात विविध ठिकाणी चुली मांडून संध्याकाळी याच परिसरात ओल्या पार्ट्या केल्या जातात. शिवाय राजरोसपणे मद्यपान केले जात असल्याचे प्रकार वन विभागाच्या हद्दीत घडत आहेत. मात्र, संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना याबाबत खबरही नसल्याचे चित्र सध्या आहे. त्यामुळे टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.
पार्टी केल्यानंतर कचरा अस्ताव्यस्त टाकणे तसेच दारूच्या बाटल्या फोडून टाकणे, असे प्रकार येथे घडतात. यामुळे येथील ग्रामस्थ त्रासले आहेत. जमिनीवर पालापाचोळा पसरलेला असताना टेकडीवर चुली पेटवून पार्ट्या केल्या जात आहेत. टेकड्यांवर, डोंगरावर आग लागणे, वणवा पेटल्याच्या घटना घडतात. निसर्गाची हानी होत आहे. टवाळखोरांकडून आग लागली, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
उरुळी कांचन येथील स्वच्छता ग्रुप व परिसरातील नागरिकांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे लावली आहेत. त्या झाडांना न चुकता दर रविवारी पाणी दिले जाते. तर दुसरीकडे टवाळखोर या परिसरात असलेले चांगले वातावरण असल्याने नियमित व्यायाम करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. शनिवार, रविवार नागरिकांचे प्रमाण भरपूर असते. काही टवाळखोर तरुण आडोशाला बसून मद्यपान करतात. त्यामुळे वातावरण दूषित होते.
जेजुरीकडून उरुळी कांचन कडे जाणाऱ्या मार्गावर शिंदवणे घाट आहे. मोठा उतार व अपघाताचा धोका असल्याने हा परिसर निर्मनुष्य आहे. हा भाग निर्मनुष्य असल्याचा फायदा या तरुणांना होतो. सध्या येथे पोलिसही फिरकत नसल्याचा फायदा घेऊन काही तळीरामांनी हा परिसर निवडला. येथे अनेक मद्यपींचा वावर वाढला असून मार्गालगतच दिवसाही पार्ट्या रंगतात. मद्यपी मोकळ्या बाटल्या तेथेच टाकून ते पसार होतात. पोलिसांची ना वनखात्याची भीती नसल्याने अनेक मद्यपी वारंवार या जागेचा वापर मद्य पिण्यासाठी व ओल्या पार्ट्या करण्यासाठी करीत आहेत.
शिंदवणे घाटात गस्त घालण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. परिसरात चुली पेटविल्या असतील किंवा मद्यपान होत असेल तर माहिती घेतो. वनरक्षकांसाठी हजारो क्षेत्र असल्याने दुसऱ्या ठिकाणीही गस्त घालावी लागत आहे. या ठिकाणी कोणी सापडतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
-प्रमोद रासकर, पूर्व हवेली वनमंडळ अधिकारी, लोणी काळभोर, ता. हवेली
शनिवारी व रविवारी मोठ्या संख्येने नागरिक या परिसरात येतात. हायवेच्या ठिकाणी कोणीही येत नसल्याने सर्हासपणे घाटात पार्ट्या सुरु आहेत. या पार्ट्यांमुळे मागील वर्षी आग लागून बरीच झाडे जाळून गेली आहेत. वनाधिकारी व पोलिसांनी अशा पार्ट्या करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची गरज आहे. वनखात्याने ठोस निर्णय घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
-संतोष चौधरी, अध्यक्ष, उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप, उरुळी कांचन, (ता. हवेली)